दि बर्निंग ट्रेन! या अपघातात सुमारे ८०० लोकांनी गमावले होते प्राण

134

भारताच्या चित्रपटाच्या इतिहासातील ‘दि बर्निंग ट्रेन’ हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. एका ट्रेनचा खूप मोठा अपघात या कथानकावर हा चित्रपट बेतलेला होता. परंतु वास्तविक आयुष्यातही असा एक मोठा रेल्वे अपघात घडला होता, ज्या अपघाताने सबंध देश हादरला. आता सहसा असे रेल्वे अपघात होत नाहीत. काही तांत्रिक बिघाड, माणसांकडून झालेली चूक, अतिशय खराब वातारवणात अशा काही कारणांमुळे असे अपघात घडतात.

( हेही वाचा : १० मिनिटांमध्ये ५० वाहनांची टक्कर! चीनमध्ये भीषण अपघात )

६ जून १९८१ हा दिवस भारतीय रेल्वेसाठी काळा दिवस मानला जातो. गाडी क्र. ४१६ डीएन पसेंजर ट्रेन मानसी ते सहरसा दरम्यान धावत होती. संध्याकाळची नयनरम्य अशी वेळ. सगळे प्रवासी नैसर्गिक सौंदर्य पाहण्यात गुंतले होते. बदला घाट स्टेशनमधून गाडी पुढे सरकली… अतिशय सुंदर असा नैसर्गिक देखावा, त्यात पाऊस… आहाहा! असेच शब्द जणू प्रवाशांच्या मुखातून बाहेर पडले असावेत. आता गाडी बदला घाट आणि धमारा घाट स्टेशनच्या मध्ये बागमती नदीचा पूल क्र. ५१ वर येऊन पोहोचली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. मागचे ७ डबे ट्रेनपासून वेगळे झाले आणि नदीत कोसळले.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या वेळी नदी पडलेल्या लोकांना वाचवायला कुणीच नव्हतं. लोक तिथे जमा होईपर्यंत त्या नदीने लोकांना भक्ष केले होते. पावसाचं वातावरण असल्यामुळे जलस्तर देखील वाढले होते. काही दिवसांनंतर सर्च ऑपरेशन चालवलं गेलं, ज्यात २०० पेक्षा जास्त प्रेतं सापडली. सरकारच्या म्हणण्यानुसार यात ३०० लोकांनी आपला जीव गमावला होता. परंतु सरकारी आकडे समाधानकारक नव्हते. आजूबाजूच्या लोकांच्या दाव्यानुसार सुमारे ८०० लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा मोठा अपघात मानला जातो. ६ जून १९८१ हा काळा दिवस ठरला!

या अपघाताचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की पुलावर ट्रेनसमोर अचानक एक गाय आली आणु तिला वाचवण्यासाठी आपत्कालीन ब्रेक दाबावा लागला म्हणून मागचे ७ डबे नदीत कोसळले. काही लोक म्हणतात की वादळ आलं होतं, तर काही लोकांच्या मते पूर आला होता. नेमकं काय झालं हे कुणालाच ठाऊक नाही. एवढं मात्र खरं की निसर्गासमोर कुणाचंच काही चालत नाही. माणूस कितीही पुढारला, त्याने कितीही प्रगती केली तरी नैसर्गिक आपत्तीसमोर तो हतबल होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.