आव्हाडांना विनोद तावडेंनी सुनावले; मोगलांचा इतिहास काढणार म्हणजे नक्की काय? सांगितली भूमिका 

151
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत बोलताना पुन्हा एकदा शिवरायांच्या इतिहासाच्या विषयाला हात घातला. शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे सांगत त्यांनी अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढणार, या भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला. त्यावर तावडे यांनी आव्हाडांना त्यांची भूमिका कडक शब्दांत समजावली. तीन ट्विट करत तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले विनोद तावडे? 

मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असे जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार. मोगलांनी कलेला आश्रय दिला, त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगले होते, हा इतिहास काढणार. ‘अकबर द ग्रेट’ ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली, याची शिकवण बाजूला काढणार. मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही. शाहिस्ते खान, औरंगजेब शिकवला म्हणजे महाराजांचे शौर्य कळते का? त्यांना असे म्हणायचे आहे का, कसाब आला म्हणून शहीद तुकारम ओंबळे, करकरे यांचे शौर्य दिसले. ते शूर होतेच, त्यासाठी कसाबने येण्याची गरज नव्हती, अशी टीका विनोद तावडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

मला एक दिवस विनोद तावडे विधानसभेत म्हणाले, आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातून काढणार. मग शिवाजी महाराज गोट्या खेळताना दाखविणार का? समोर औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. त्यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवितात हे जगासमोर येते. १६६९ मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा खजिन्याचे टाळे उघडा, हे सांगणारे शिवाजी महाराज जगातले पहिले राजे होते, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथील सभेत केले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.