मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना

211

हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. याच उद्देशाने दोन दिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला आलेल्या 300 हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते यांनी एकत्र येत मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या परिषदेत मंदिर चळवळ उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना उपस्थित विश्वस्तांच्या एकमताने करण्यात आली, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी येथील ‘पद्मालय विश्रामगृहा’त आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे सचिव नीळकंठ चौधरी, जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे श्रीराम जोशी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते. मंदिरांची सुरक्षा, समन्वय, संघटन, संपर्क यंत्रणा आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्र होणे, यांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांवरील सर्व प्रकारचे आघात, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातील. मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देणे, मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होण्यासाठी आग्रह धरणे, मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे शासकीय-प्रशासकीय हस्तक्षेप होऊ न देणे, अशी भूमिका ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या स्थापनेवेळी निश्चित करण्यात आली. मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग करणे, मंदिरांमध्ये धर्मशास्त्रानुसार वस्त्रसंहिता लागू करणे, समाजाचे संघटन होण्यासाठी मंदिरांत सामूहिक गुढीपाडवा, सामूहिक शस्त्रपूजन, हनुमानचालिसा पठण, महाआरती आदी उपक्रम चालू करणे, मंदिरांवरील आघातांच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारणे आदी कार्य महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात येईल, अशी माहिती सुनील घनवट यांनी दिली.

(हेही वाचा तुर्कीतील भूकंपाबाबत ३ दिवसांपूर्वीच मिळालेले पूर्वसंकेत; ट्विट होतेय व्हायरल)

मंदिररक्षणाचे कार्य करणार्‍यांचा ‘मंदिर योद्धे’ म्हणून सन्मान 

मंदिरांतील सरकारीकरण रोखणे, सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील भ्रष्टाचारआदी अपप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करणे, मंदिरांतील प्रथा-परंपरा यांवरील घाला रोखणे, मंदिरांच्या जागेवरील अतिक्रमण हटवणे, मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन आणणे आदी कार्य करणार्‍या विश्वस्तांचा पद्मालय देवस्थानच्या वतीने ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन 12 जणांचा ‘मंदिररक्षक योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आल्याचे या वेळी सुनील घनवट यांनी सांगितले.

ॐ काराचा उच्चारात एकमताने ठराव संमत 

  • महाराष्ट्र सरकारने सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे.
  • राज्य सरकारने मंदिरांची संपत्ती विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी.
  • पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या; परंतु प्रशासन, पुरातत्त्व विभाग यांकडून दुर्लक्षित मंदिरांचा तात्काळ जीर्णोद्धार करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी.
  • राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ल्यांवरील मंदिरे यांवरील इस्लामी, तसेच अन्य अतिक्रमण यांचे सर्वेक्षण करून ती तात्काळ हटवावीत.
  • मंदिरांच्या पुजारीवर्गाचे उत्पन्न नगण्य असल्याने सरकारने त्यांना प्रतिमाह मानधन द्यावे.
  • मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांच्या पावित्र्यरक्षणार्थ त्यांच्या परिसरात मद्य-मांस यांची विक्री करता येणार नाही, अशी शासनाने अधिसूचना काढावी.
  • राज्यातील ‘क’ वर्गातील योग्य कागदपत्रे उपलब्ध असलेल्या मंदिरांना त्वरित ‘ब’ वर्गात वर्गीकृत करावे.
  • मंदिरांना सामाजिक कारणांसाठी देणगी देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडून आज्ञापत्रे पाठवली जाऊ नयेत.
  • मंदिरांचा निधी प्राधान्याने धार्मिक कार्यासाठीच उपयोगात आणावा, यासाठी शासन आदेश काढण्यात यावा.

या ठरावांचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री आणि विधी अन् न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून देण्यात येतील. या ठरावांसह ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी पुढील कृती योजनाही ठरवण्यात आली असल्याची माहिती सुनील घनवट यांनी दिली.

या मंदिर परिषदेला श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान (पुणे), श्रीक्षेत्र घृष्णेश्वर देवस्थान (वेरुळ, संभाजीनगर),अष्टविनायक मंदिर ट्रस्ट, श्री तुळजापूर देवस्थान पुजारी मंडळ, श्री काळाराम मंदिर (नाशिक), श्री लक्ष्मण मंदिर (पंचवटी, नाशिक), श्री रेणुकामाता मंदिर (माहूर), श्री कानिफनाथ देवस्थान (गुहा), श्री गणपति मंदिर देवस्थान मंडळ (पद्मालय, जळगाव), श्रीराम मंदिर (जळगाव), श्री मंगळग्रह सेवा संस्थान (अमळनेर), अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, बालाजी मंदिर (पारोळा), नवकार जैन टेम्पल ट्रस्ट, श्री बालाजी महाराज संस्थान (देऊळगाव राजा) यांसह महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. काशी येथील ‘ज्ञानवापी’ मुक्तीसाठी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, जैन इरिगेशनचे आणि श्री पद्मालय मंदिराचे अध्यक्ष अशोक जैन, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.