मुंबईच्या वाढत्या वायूप्रदूषणाची पातळी कोणत्याही धोक्याच्या पातळीवर नाही, हिवाळ्यात धूलिकणांची मात्रा दरवर्षाला वाढलेली दिसून येते. मुंबईतील वाहतूक कोंडी, बांधकामे वर्षाच्या बारा महिने दिसून येतात. हिवाळ्यात वा-यांचा वेग मंदावल्याने वायूप्रदूषण जाणवते. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात हवेचा दर्जा ब-यापैकी सुधारला होता. यंदाच्या वर्षांत जीवनमान पूर्ववत होत असल्याने आता चाकरमनी मुंबईकर घराबाहेर कामासाठी बाहेर पडू लागला आहे. हवेची गुणवत्ता आता हिवाळ्यातील ऋतुमानाप्रमाणेच खराब दिसून येत आहे. यात घाबरण्यासारखे काहीच नाही, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी सांगितले.
दर वर्षाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळते. मुंबईत या दोन महिन्यांत हवेचा दर्जा खराब वर्गवारीत दर्शवला जातो. मुंबईतील हवेच्या दर्जाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय पृथ्वी व विज्ञान विभागाच्या सफर या ऑनलाईन प्रणालीतून मूल्यमापन केले जाते. मात्र दोन्ही प्रणातील हवेच्या मूल्यमापनामध्ये तफावत असल्याचा मुद्दा आता चर्चिला जात आहे. मुंबईत हिवाळ्यात फारच अभावतेने हवेचा दर्जा ३०० प्रति क्यूबीक मीटरमध्ये नोंदवला जातो. या वर्गवारीपुढे हवेचा दर्जा जात असेल तर संबंधित दिवसाला आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक ठरते. ज्या ठिकाणी हवेचा दर्जा ३०० प्रति क्यूबीक मीटरपुढे जातो. त्या भागात प्रवास करणे टाळण्याचे आवाहन केले जाते. गेल्या काही दिवसांत काही भागांत हवेची गुणवत्ता अतिखराब दिसून आली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उभारलेल्या वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर आणि मालाड या स्थानकांत हवेचा दर्जा अतिखराब दिसून आला. या स्थानकांची उभारणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांकानुसार झाली आहे. या स्थानकांवर माहिती योग्य असून, सफर या ऑनलाईन प्रणालीतील माहिती शास्त्रीयदृष्ट्या चुकीची असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.
(हेही वाचा भारतीयांचा प्रामाणिकपणा परदेशी नागरिकांना भावला; सोशल मीडियातून मात्र रवीश कुमारांवर टीका )
दोन आठवड्यांपूर्वी २६ ते २८ जानेवारी रोजी वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, मालाड या स्थानकांतील हवेचा दर्जा ढासळला होता. या दिवशी चारही स्थानकांमधील हवेचा दर्जा ३०० प्रति क्युबीक मीटरपेक्षा जास्त नोंदवला गेला. त्यानंतर हवेचा दर्जा मुंबईतील प्रदूषण नियंत्रण मंडळाने उभारलेल्या सातही स्थानकांमध्ये सर्वसाधारण दिसून आला. वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, मालाड या चारही स्थानकांसह बोरिवली, कुलाबा, कांदिवली. कुर्ला, विमानतळ परिसर, मुलुंड, पवई, सायन, विलेपार्ले आणि वरळीत हवेची गुणवत्ता साधारण दिसून आली. मात्र सफरच्या नोंदीत हवेचा दर्जा जास्त दिसून येत होता. सफरने वायू प्रदूषणाच्या नोंदीसाठी उभारलेली स्थानके अशास्त्रीय असल्याचेही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिका-यांनी सांगितले. मंगळवारी या संदर्भात पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सफरचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community