कणकवली तालुक्यातील केनेडी येथे दोन गटात झालेल्या राजकीय राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या फिर्यादीवरुन आमदार वैभव नाईक यांच्यावर कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कणकवली पोलीस अॅक्शन मोडवर आले असून अत्यंत गुप्तपणे हालचाली सुरु आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
कणकवली तालुक्यातील केनेडी बाजारपेठेत 24 जानेवारीला शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. भाजपचे शेकडो कार्यकर्ते केनेडी बाजारपेठेत दाखल झाले. ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही कार्यकर्त्यांची या ठिकाणी जमवाजमव केली होती आणि दोन्ही बाजूचे आक्रमक कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयांवर चालून गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी किंवा बुधवारी दिवसभरात सदर गुन्ह्यांमधील नावे नमूद असलेले दोन्ही पक्षांचे काही ठराविक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वत:हून पोलिसांत हजर राहण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्याचे समजते. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून किंवा बुधवारपासून हे संशयित पोलिसांत हजर होतील किंवा रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतल्याचे रेकाॅर्डवर दाखवले जाईल. त्यादृष्टीने पोलिसांकडून हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community