महापालिकेचा आणखी एक लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात

191

मुंबई महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये लाचलूचपत विभागाच्यावतीने कारवाई सुरु असतानाच आता आणखी एका दुय्यम अभियंत्याला साडे आठ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. महापालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाचा हा दुय्यम अभियंता असून दोन मजली घराचे अनधिकृत बांधकाम तोडू नये म्हणून या अभियंत्यांने लाचेची मागणी केली होती. त्यामुळे लाचेची ही रक्कम स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत त्याला अटक केली.

( हेही वाचा : WPL 2023 : महिला प्रीमियर लीगची तारीख ठरली! मुंबईत पहिल्या हंगामाचे आयोजन )

मुंबई महापालिकेच्या वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाने चॅपेल रोड परिसरातील दोन मजली या राहत्या घराला १६ जानेवारी २०२३ रोजी नोटीस पाठवली होती. या नोटीस नंतर बांधकामाच्या मालकाने या राहत्या घराचे बांधकाम अनधिकृत नसल्याने या बांधकामावर कारवाई न करण्याची विनंती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. परंतु हे बांधकाम तोडायचे नसेल तर १५ लाख रुपये देण्यात यावे अशाप्रकारची मागणी केली असे लाचलूचपत विभागाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. त्यानंतर १५ लाखांऐवजी ९ लाख रुपयांची मागणी केली.

त्यामुळे फिर्यादीने या प्रकरणी ६ फेब्रुवारी २०२३ लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार मंगळवारी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी एच पश्चिम विभागात सापळा रचण्यात आला. यामध्ये ९ लाख रुपयांऐवजी साडे आठ लाख रुपयांची रक्कम देण्यावर तडजोड झाल्याने ही रक्कम मंगळवारी स्वीकारण्याची तयारी दुय्यम अभियंत्यांनी दाखवली होती. त्यानुसार एच पश्चिम विभागात रचलेल्या सापळ्यात दुय्यम अभियंत्याला साडे आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून अप्पर पोलिस आयुक्त (लाचलूचपत प्रतिबंधक विभाग) विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती या विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंत लाचखोरीची ३९५ प्रकरणे, ५५ कर्मचारी बडतर्फ तसेच निलंबित

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचारी बडतर्फ तसेच सेवेतून कमी केले तर सेवेतून काढून टाकले. तर या गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले ८१ याप्रमाणे एकूण १३४ कर्मचारी निलंबित करुन महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याद्वारे सन २०१८ पासून एकूण ३९५ प्रकरणांमध्ये चौकशी करण्याची मंजुरी मागण्यात आली. ३९५ पैकी तब्बल ३५९ प्रकरणांमध्ये संबंधित खातेप्रमुख यांनी संपूर्ण तपासणी तथा चौकशी केली असता त्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्यामुळे, या सर्व तक्रारी सक्षम अधिका-यांच्या मंजुरीने दफ्तरी दाखल केल्या आहेत. तर १८ प्रकरणांमध्ये महानगरपालिकेच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. १४ प्रकरणांमध्ये प्रथमदर्शनी कोणतेही तथ्य आढळले नाही, म्हणून पडताळणीअंती सक्षम अधिका-यांच्या मंजुरीने ही प्रकरणे दफ्तरी दाखल करण्यात आली. ४ प्रकरणांमध्ये संबंधित खातेप्रमुखांना काही प्रमाणात तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने महानगरपालिकेच्या स्‍तरावर संबंधित कर्मचा-यांबाबत चौकशी तथा कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.