आम्हाला आयते मिळाले नाही, शाखाप्रमुख होवून आलो आहे. कुणाला आव्हान देत आहात. आव्हाने पेलत पेलतच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत, काही लोक आव्हाने देत आहेत, एकनाथ शिंदे छोटी मोठी आव्हाने स्वीकारत नाही. मोठी मोठी आव्हाने स्वीकारतो, जे सहा महिन्यापूर्वी स्वीकारले होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना वरळीत आपल्यासोबत निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते.
हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. आम्ही मेहनत, संघर्ष करून इथवर पोहोचलो आहोत. या सरकारने गेल्या सहा महिन्यांमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले. पहिल्या दिवसापासून आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. कोळीवाड्यांचे सीमांकन असेल, डिझेल परताव्याचा विषय असेल, कोळीवाड्यातील पुनर्विकासासाठी योजना असेल, आम्ही जे बोलतो ते करतो, पण काही लोक निवडणूक जवळ आल्यावर मुंबईचे तुकडे पडणार, ती केंद्रशासित होणार असे जावई शोध लावतात. मी सांगतो मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तिची एक इंच जमीन जाऊ देणार नाही. जे घालवायाचे होते ते आम्ही सहा महिन्याआधी घालवून टाकले. काही लोक त्यावेळी म्हणाले, वरळीतून जाऊन दाखवा, हा एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने न जाता रस्त्यावरून वरळीतून गेला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
वरळी येथे कोळी बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार केला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. २०१९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मते मागितली होती, त्यामुळे सरकार शिवसेना – भाजपचे स्थापन व्हायला पाहिजे होते, पण झाले उलटे. जे २०१९ ला व्ह्यायला पाहिजे होते, त्याची दुरुस्ती आम्ही केली, म्हणून तर कोळी बांधवांनी आमचा सत्कार केला. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत, सरकार आल्यावर आम्ही खड्डेमुक्त मुंबई करण्याचे काम हाती घेतले, प्रत्येक वसाहतीत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करत आहोत. मेट्रो २ आणि ७ चे लोकार्पण झाले आहे. मेट्रोच्या प्रकल्पांना अहंकारापोटी स्थगित केले होते ते आम्ही पुन्हा सुरु केले. एका खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर दूर ठेवले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
(हेही वाचा ‘गोबेल्स नीती’ अवलंबणा-या ‘बीबीसी’ला धडा शिकवायला हवा – अभय वर्तक)
कोळी समाज शांत, प्रेमळ, जीवाला जीव देणारा, तेवढाच निडर समाज आहे. समुद्रातील लाटांना सामोरे जातो. खोल समुद्रात उदरनिर्वाह करण्यासाठी कोळी बांधव जात असतो. मी कोळी नसलो तरी माझे कोळी व्यवसायाशी जवळचे संबंध आहे. माझी सुरुवात झाली तेव्हा वागळे इस्टेट येथे मासे विकण्याचा व्यवसाय मी केला आहे. मी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी आले होते, तेव्हा त्यांचे स्वागत कोळी बांधवानी केले होते. कोळी बांधवांनी बराक ओबामा यांचेही स्वागत केले होते. दीड वर्षांपूर्वी कोळी बांधवांनी कोस्टल रोडमध्ये दोन पिलरमधील अंतर वाढवायचे होते म्हणून आंदोलन केले होते, पण सत्तेची हवा असलेल्यांना या गोष्टींकडे पहावेसे वाटत नव्हते. हुकूमशाहीवाल्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर आपले सरकार आले आणि दोन – तीन बैठक लावल्या आणि तुमची मागणी रास्त होती म्हणून आम्ही दोन पिलरमधील अंतर १२० मीटर वाढवले, पण तुमच्यातील आणि आमच्यातील अंतर कमी झाले, हे सांगायला आलो आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community