गृहस्वप्न साकार होणार! म्हाडाच्या औरंगाबाद विभागासाठी सोडत जाहीर

184

म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या ८४९ सदनिका व ८७ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सोडतीसाठी दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असून दिनांक १० मार्च २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 या संगणकीय app अंतर्गत व https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येईल.

( हेही वाचा : औरंगाबादमधील गोंधळानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, शिवसंवाद यात्रेला अतिरिक्त पोलीस राहणार तैनात)

या सोडतीसाठी ऑनलाईन अनामत रकमेच्या स्वीकृतीस ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार असून ११ मार्च, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १८ मार्च, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे. दिनांक २२ मार्च, २०२३ रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सकाळी ११.०० वाजता जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे, ऍपवर तसेच संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे. 
       
म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय APP चा वापर करणारे औरंगाबाद मंडळ हे म्हाडाचे दुसरे मंडळ आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीदरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार आहे.   

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ८४९ सदनिकांपैकी ६०५ सदनिका प्रधानमंत्री आवास  योजना (शहरी) अंतर्गत आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३० सदनिका व ०८ भूखंड, अल्प उत्पन्न गटासाठी ३७ सदनिका व २८ भूखंड, मध्यम उत्पन्न गटासाठी १०२ सदनिका व ४९ भूखंड, उच्च उत्पन्न गटासाठी ३ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत ७४ सदनिका असून या गटासाठी उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली आहे.सोडतीसाठी अर्ज नोंदणीकरिता ०२२६९४६८१०० व ऑनलाईन पेमेंट करिता ८८८८०८७७६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या व भूखंडांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस औरंगाबाद मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही असेही म्हाडाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.