मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे होणार आहे. या गाड्यांमध्ये मिळणारा नाश्ता, जेवण याबाबत IRCTC कडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. वंदे भारतच्या जेवणामध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच पर्यटकांनाही राज्याच्या प्रादेशिक पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी IRCTC कडून विशेष नियोजन केले जात आहे. दोन्ही गाड्यांमध्ये नाश्तासाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारी भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय देण्यात आले आहेत.
( हेही वाचा : २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन; ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार)
वंदे भारतमध्ये मिळणार प्रादेशिक पदार्थ
जेवणासाठी अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, उसळ असे पर्याय वंदे भारतमध्ये देण्यात येणार आहेत. या खाद्यपदार्थांची प्रादेशिक चव कायम रहावी यासाटी स्थानिक महिला बचत गटांनी बनवलेल्या पदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवासी तिकीट आरक्षण करताना जेवणाचे पर्याय निवडू शकतात यावेळीच प्रवाशांना पेमेंट प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे यानंतर प्रवासादरम्यान तुम्हाला आवडीच्या प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतील असे IRCTC ने स्पष्ट केले आहे.
असा असेल मेन्यू
- नाश्ता – साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारी भाकरी – बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा, भडंग
- जेवण – अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ, ज्वारी-बाजरी किंवा नाचणीची भाकरी.
- सायंकाळचा नाश्ता – शेगाव कचोरी, कोथिंबीर वडी, भरड धान्यांचे थालिपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा
- सोलापूर वंदे भारत मांसाहारी पदार्थ – सावजी चिकन, कोल्हापुरी चिकन, तांबडा रस्सा