राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये ‘वंदे मातरम्’ने होते. आता ‘वंदे मातरम्’ नंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ म्हटले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बुधवारी घेण्यात आली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा – गर्जा महाराष्ट्र माझा” हे कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणाचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फूर्तीदायक व प्रेरणा देणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे.
जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीतातील एकूण 2 चरणे वाजविण्यात येणार असून याचा अवधी 1 मिनिट 41 सेकंद असेल. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून वाजविण्यात येणाऱ्या या 2 चरणाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधुत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे आणि वैशाली माडे यांनी गायले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र गीत येत्या १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. हे राज्यगीत १ मिनिट ४१ सेकंद गायिले किंवा पोलिस बँडवरती वाजविले जाईल.
Join Our WhatsApp Community