अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार १३ विधेयके मांडणार

103
येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार १३ विधेयके मांडणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर केला जाईल. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
अर्थसंकल्पावर तीन दिवस, तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) ५ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) ८ अशी १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहात विशेष चर्चा होईल.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत  पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड् आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.