शिवसेनेने लोकशाही पद्धतीने पक्षातंर्गत निवडणूक घेतल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी केला आहे. मात्र शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी हा दावा खोडून टाकला आणि जर पक्षातंर्गत निवडणूक घेतली असेल तर त्यांचे व्हिडीओ सादर करावेत, पुरावे द्यावेत, असे आव्हान देत अनिल देसाई यांनी शिवसैनिकांची दिशाभूल केली आहे, असेही शेवाळे म्हणाले.
पक्षातंर्गत निवडणुका झाल्याच नाही
शिवसेनेची घटना १९९८मध्ये तयार झाली. त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. आयोगाने ३० वेळा शिवसेनेकडे पत्रव्यवहार केला. लोकशाहीप्रमाणे निवडणूक घेण्यास सांगितले, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे अमान्य होते, मात्र निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी रद्द करू, असे सांगितल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लोकशाही पद्धतीने पक्षातंर्गत निवडणूक घेतल्या. मात्र २०१३ आणि २०१८ ला पक्षाच्या घटनेत सुधारणा केली, त्यात शिवसेनाप्रमुख पद अबाधित ठेवण्यात आले. परंतु पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पक्षात लोकशाही पद्धत राबवली जाईल, याची जी हमी दिली होती, त्याप्रमाणे २०१३ नंतर लोकशाही पद्धत राबवण्यात आली नाही. अनिल देसाई यांनी पक्षातंर्गत लोकशाही कशी राबवली जाते याची पद्धत सांगितली, त्यात पक्षातंर्गत निवडणुका घेतल्या असल्याचा दावा केला. त्यासाठी निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती केली, दैनिकात जाहिरात दिली, असे सांगितले. आम्ही अनिल देसाई यांना आव्हान करतो की, त्यांनी कोणते निवडणूक अधिकारी नेमले होते आणि निवडणुकीसाठी कोणत्या दैनिकात जाहिरात दिली होती. घटनेत मुंबईतील गटप्रमुखांनाही प्रतिनिधी सभेत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार २०१३ आणि २०१८ मध्ये कोणत्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांची निवड करताना मतदान केले? कुठल्या हॉलमध्ये मतदान झाले? मुंबईतील २० हजार ते ३० हजार गटप्रमुख आहेत, त्यासाठी स्टेडियम बुक करावे लागेल, तेव्हा असे कधी स्टेडियम बुक केले होते? मी शाखाप्रमुख पदापासून खासदार झालो आहे. माझ्या माहितीप्रमाणे कधीच अशी निवडणूक झाली नाही, असेही खासदार शेवाळे म्हणाले.
(हेही वाचा २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन; ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार)
Join Our WhatsApp Community