कोरोनामुळे होतोय लोकांना निद्रानाश; सर्व्हेतून समोर आले सत्य

155

सबंध जगासाठी सर्वात त्रासदायक काळ हा कोरोना काळ ठरला. कोरोनामुळे केवळ शरीरावरच नव्हे तर मनावरही परिणाम झाला. लॉकडाऊन लागल्यामुळे अनेकांची मने कोमेजली. तो काळ आठवला तरी मन कासावीस होते. भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशाची परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली असताना भारताने मात्र स्वतःला सावरले आणि जगालाही सावरले.

कोरोनानंतर मात्र अनेकांना विविध समस्या सतावू लागल्या. जगभरात काही सामान्य लक्षणे दिसून आली. श्वास घेण्यास त्रास, ब्रेन फोगिंग म्हणजे स्मरण शक्तीवर परिणाम होणे जसे स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण येणे, सुस्ती येणे, थकवा येणे, विचारात सुसंगतता नसणे, चिडचिडेपणा अशी लक्षणे यात दिसून येतात. आता संशोधनातून हे आढळून आले आहे की कोरोनामुळे झोपेवर देखील परिणाम झाला आहे.

(हेही वाचा ‘ईडी’मुळे विरोधक एकत्र, विरोधकांनी धन्यवाद मानावे; पंतप्रधान मोदींची टीका)

जगभरातील अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की कोरोना झालेल्यांना स्लीप डिस्टर्बेन्सचा त्रास होत आहे. स्लीप फाऊंडेशन या संस्थेने एक सर्व्हे केला आहे, ज्यात ४०% लोकांना झोपेची समस्या असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३६% लोकांमध्ये ही लक्षणे दिसून आली. चांगली झोप न झाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती देखील कमी झाली. इ-क्लिनिकल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात संशोधकांनी ५६ देशांतील ३,७६२ सहभागींना ऑनलाइन फॉर्म पाठवले, ज्यामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. सहभागींना दीर्घकाळ कोविडचा त्रास होता. सहभागींकडून मिळालेली उत्तरे थक्क करणारी आहे. कारण त्यांच्यापैकी सुमारे ८०% लोकांना झोपेचा त्रास आहे. या समस्यांमध्ये निद्रानाशाचे सर्वाधिक प्रमाण आढळून आले आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही हा त्रास अंगावर काढू नये आणि त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण निद्रानाश ही समस्या भविष्यात येणार्‍या अनेक रोगांचे कारण ठरु शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगणे कधीही उत्तम.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.