आरेत आठवड्याभरापूर्वी छोटा काश्मीर परिसरात बिबट्याच्या बछड्याचा जखमी अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालात प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. शरीरावरील जखमा पाहता बछड्याचा मृत्यू बिबट्याने केलेल्या हल्ल्यातून झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांनी दिली.
भल्या पहाटे बिबट्याच्या बछड्यावर हल्ला
सकाळी साडेसहाच्या सुमारास आरेतील स्थानिकांना बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला. शरीरावरील जखमा पाहता कुत्रा किंवा बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता प्राथमिक अंदाजातून वर्तवण्यात आली होती. स्थानिकांच्या आरोपानुसार, आरेतील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने कुत्र्यानेही बिबट्याच्या बछड्याला मारल्याची शक्यता वर्तवली. मृतदेहावरील जखमा ताज्या असल्याने रात्री किंवा भल्या पहाटे बिबट्याच्या बछड्यावर हल्ला झाला असल्याची शक्यता घटनास्थळी पोहोचलेल्या वनाधिका-यांनी वर्तवली. सात ते आठ महिन्यांच्या नर बिबट्याचा मृतदेह तातडीने बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेला गेला. परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील पशुवैद्यकीय अधिका-यांनी बिबट्याच्या शरीराचे शवविच्छेदन केले. पशुवैद्यकीय अधिका-यांच्या नोंदीत, बिबट्याच्या मानेवर सुळ्यासारख्या दातांच्या चाव्याने तयार झालेल्या खुणा दिसून आल्या. मानेचा मणका तुटला होता. जखमा पाहता बिबट्याच्या चाव्यानेच बछड्याचा मृत्यू झाल्याचे सिद्ध होते. सात ते आठ महिन्यांच्या बछड्यासोबत त्याची आईदेखील नव्हती. बिबट्या भरटकला असल्याची दाट शक्यता असल्याचा दावा वन्यजीव अभ्यासकांनी केला.
(हेही वाचा ‘ईडी’मुळे विरोधक एकत्र, विरोधकांनी धन्यवाद मानावे; पंतप्रधान मोदींची टीका)
Join Our WhatsApp Community