बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचे लोकार्पण; मुंबई आणि ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

143

मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होऊन ती सुरळीत होणार आहे.

( हेही वाचा : Kasba, Chinchwad By-Election:…तर तुमचा पराभव निश्चित समजा; मनसेच्या नेत्याचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान )

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह आदी उपस्थित होते.

या पुलाचे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामासाठी प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर हा ५+५ मार्गिकांचा आहे तर ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पुल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. २+२ पथ मर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.

या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गाखालून वाहानांच्या रहदारीसाठी २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकारण देखील करण्यात आले आहे.

प्रवाशांचा वेळ वाचणार

कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त तासांत (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३०ते ४० मिनिटे लागतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा आता हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी दिली.

एकनाथ शिंदेंनी कापला केक

कोपरी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी केक कापण्यात आला. उपस्थित मान्यवरांना मुख्यमंत्री महोदयांनी केक भरवून वाढदिवस साजरा केला. आमदार प्रताप सरनाईक यांनी धनुष्यबाणाचे प्रतीक यावेळी मुख्यमंत्री यांना भेट दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.