आमच्यात नाक खुपसू नका; काँग्रेसचे उद्धवसेनेला प्रत्युत्तर

123

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उद्धवसेनेला दिले आहे.

( हेही वाचा : पोटनिवडणुकीसाठी भाजपचे ४०, तर मविआचे २० स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरणार)

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्वजण त्याचा मान राखतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरु झाली या आरोपात काहीही अर्थ नाही. जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते तर पुढचा प्रसंग टळला असता, या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थच नसतो. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच मविआ सरकार अडचणीत आले असे म्हणणेही योग्य नाही, त्याला इतरही काही कारणे असू शकतात.

काँग्रेस पक्षाने काय निर्णय घ्यावेत हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचा निर्णय चुकीचा ठरला असा आरोप करून मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर अशी जाहीरपणे टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरुन नाही, असेही लोंढे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.