एचआयव्हीग्रस्त पत्नीने दिली एचआयव्हीग्रस्त पतीला किडनी…जगातील दुर्मिळ मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची नोंद

183
एचआयव्हीग्रस्त पत्नीने एचआयव्हीग्रस्त पतीला मूत्रपिंड दान करुन नवे जीवनदान दिले. दोघांचा रक्तगटही भिन्न असताना या अवघड आणि आव्हानात्मक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. संभाजीनगर येथील मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी एचआयव्हीग्रस्त रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच केस असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. या शस्त्रक्रियेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर जनरल प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सचिन सोनी यांनी दिली.

नेमकी काय होती घटना?

बीड जिल्ह्यातील ४८ वर्षीय नितीन देसाई (बदलेले नाव) कापूस व्यापारी आहेत. २००८ साली नितीन यांना एचआयव्हीची लागण झाली. उपचार सुरु असतानाच २०१९ साली उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी झाले. २०२० साली नितीन यांनी मेडिकव्हर रुग्णालयातील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संदीप सोनी यांच्याशी संपर्क साधला. नितीन गेल्या तीन वर्षांपासून डायलिसिसवर होते. तब्येत खालावल्याने त्यांना अशक्तपणा आला होता. अखेरिस मूत्रपिंडाचा पर्याय डॉक्टरांनी रुग्णाला सूचवला. रुग्णाची पत्नीही एचआयव्हीग्रस्त असल्याने तिने स्वतःहून नव-याचा जीव वाचवण्यासाठी दाता होण्याचा निर्णय घेतला. अखेरिस १८ जानेवारीला मेडिकव्हर रुग्णालयात नितीन यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णाला दहा दिवसांपूर्वीच यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिल्याची माहिती डॉ. सोनी यांनी दिली.

(हेही वाचा पंतप्रधानांचे ‘ते’ वक्तव्य खोटे ठरवण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न; FACT CHECK मधून पर्दाफाश)

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसमोरील आव्हान

  • एचआयव्हीग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती अगोदरच कमी असते. प्रत्यारोपणादरम्यान वापरण्यात आलेली औषधे अशा रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती आणखी कमकुवत करु शकतात.
  • दोघेही एचआयव्हीबाधित होते. रक्तगटातील विसंगतीमुळे शस्त्रक्रियेसमोर आव्हान होते.
  • या रुग्णासाठी सुधारित औषधांचा डोस आणि उपचारांच्या मदतीने प्रत्यारोपण केले. तब्बल ४ तास शस्त्रक्रिया सुरु होती.

रुग्णाची सद्यस्थिती

नितीन यांना आता जेवण करता येते. तब्येतीतही सुधारणा आहे. वजनही वाढले आहे. कोणत्याही अडचणीशिवाय दैनंदिन क्रिया करता येते.

डॉक्टरांची टीम

नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सचिन सोनी, डॉ. शरद सोमाणी, डॉ. प्रशांत दरख, डॉ. राहुल रुईकर, डॉ. मयुर दळवी, डॉ. दिनेश लाहिरे, डॉ. सुनील मुरकी, डॉ. अभिजीत कबाडे, डॉ. निनाद धोकटे यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत सहभाग नोंदवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.