ट्राफिक जंक्शन भागांत होणा-या वायू प्रदूषणाची मोजणी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१६ साली मुंबईतील पाच महत्त्वाच्या ठिकाणी वायू ही यंत्रणा कार्यान्वित केली होती. या मशीनमध्ये वातावरणातील धूलिकण खेचून शुद्ध हवा बाहेर उत्सर्जित करण्याची क्षमता होती. निरी या संस्थेची निर्मिती असलेल्या हवा शुद्धीकरण मशीन्स वापरात येण्यासाठीआता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुरता विसर पडला आहे. पालिकेनेच या मशीन्सबाबत विचार करावा, असा मुद्दा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वायू प्रदूषण विभागाचे संचालक डॉ व्ही मोटघरे यांनी मांडला. याबाबतचा प्रायोगिक तत्त्वावरील अभ्यास पूर्ण झाला असून, संबंधित स्वराज संस्थांनी हवा प्रदूषण कमी करण्यासाठी वायू यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घ्यावा, असे मत डॉ मोटघरे यांनी मांडले.
२०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या काळात वांद्रे येथील कलानगर जंक्शन, सायन येथील द्रूतगती महामार्गावरील पूल, घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा, भांडूप येथील एलबीएस मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळी सिग्नल येथे वायू ही मशीन कार्यान्वित करण्यात आली होती. प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन वर्ष या प्रकल्पाचा अभ्यास केला. या मशीनमुळे वातावरणातील १० ते २० टक्के घातक धूलिकण मशीन्ममध्ये खेचले जातील, असा निष्कर्ष आयआयटीच्या अभ्यासातून समोर आल्याचे डॉक्टर मोटघरे म्हणाले.
या मशीन्स हाताळण्याचे तसेच या प्रकल्पाचा अभ्यास करण्याची जबाबदारी आयआयटीला देण्यात आली होती. या मशीन्सची निर्मिती निरी संस्थेने केली होती. संशोधन आणि विकास याअंतर्गत दोन वर्ष पाचही स्थानांतील धूलिकणांचा आयआयटीकडून अभ्यास केला गेला. दर तीन महिन्यांनी मशीनमध्ये साचलेल्या धूळीचे मोजमापन केले जायचे. ट्राफिक जंक्शनच्या ठिकाणी कार्बन मोनोक्साईड, तरंगणारे धूलिकण यांचा प्रभाव जास्त दिसून येत असल्याचेही निरीक्षण या मशीनमध्ये दिसून आले होते. मुंबईत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्लीतील ढासळत्या वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी या मशीन्स लावल्या गेल्या होत्या. २०१९ साली दिल्लीतील वेगवेगळ्या ट्राफिक जंक्शनवर वायू हवा शुद्धीकरण मशीन लावली गेली होती. या मशीनच्या वापराने किमान ट्राफिक जंक्शनवरील वायू प्रदूषण कमी करण्यावर तातडीने पावले उचलावीत ही मागणी जोर धरु लागली आहे.
( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा; वाहतुकीच्या मार्गात बदल, जाणून घ्या सविस्तर )
Join Our WhatsApp Communityकेवळ ट्राफिक जंक्शनसारख्या मर्यादित जागेत वायूच्या मशीन्समुळे बदल पाहायला मिळतील. संपूर्ण मुंबई शहरातील हवेचा ढासळेला दर्जा एकट्या वायू या मशीनमुळे कमी होणार नाही. त्यासाठी अगोदरपासूनच्या प्रस्तावित उपाययोजना अंमलात आणायला हव्या.- राकेशकुमार, माजी संचालक, निरी (नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट)