गोमंतक मय ब्राह्मण संस्था ५० वर्षे पूर्ण करीत आहे. या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी संमेलनाचे आयोजन येत्या रविवारी म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. विलेपार्ले पूर्व परिसरातील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या कालावधी दरम्यान आयोजित या कार्यक्रमाला संस्थेच्या सभासदांनी आपल्या कुटुंबीयांसह आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाद्वारे या निमित्ताने करण्यात आले आहे.
पारंपरिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण कलांची आराधना करणारा आणि विशेष करून काष्ठशिल्प निर्मितीची साधना करणारा समाज म्हणून गोमंतक मय ब्राह्मण समाज ओळखला जातो. मुंबईमध्ये गोमंतक मय ब्राह्मण या समाजाच्या सार्वजनिक न्यासाची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली होती. या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष दिलीप चारी यांनी सांगितले की, सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनामध्ये सुगम संगीत कार्यक्रम, एकांकिका सादरीकरण, पंडित रवींद्र चारी यांचे सतार वादन, संस्था व समाजाबाबत स्लाईड शो अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्याचबरोबर एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन देखील सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलना दरम्यान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेद्वारे देण्यात येणारी शिष्यवृत्ती, वैद्यकीय मदत यासारख्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील या स्नेह संमेलनादरम्यान देण्यात येणार आहे. तरी संस्थेच्या सभासदांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाद्वारे करण्यात आले आहे.
( हेही वाचा: Tiktok Layoffs: टिकटाॅकमधील सर्व भारतीय कर्मचा-यांना नारळ )
सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनाबाबत अधिक माहितीसाठी कृपया सभासदांनी व समाज बांधवांनी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल चारी यांच्या ८२९१-००-६३८८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे देखील संस्थेच्या कार्यकारी मंडळाद्वारे कळविण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community