मुंबईतील १४,०७४ महिलांना शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र: कोणत्या महिला ठरणार लॉटरीत लाभार्थी?

331

मुंबईतील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध यंत्रांची खरेदी करून त्याचा लाभ दिला जातो. महापालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी ६३५६ शिवणयंत्र आणि ६३५६ घरघंटी तसेच १३६२ मसाला कांडप यंत्राचे वाटप केले जाणार आहे. या योजनेतंर्गत पात्र महिलांना यंत्राच्या एकूण रकमेच्या केवळ ५ टक्के रक्कम भरावी लागणार असून उर्वरीत ९५ टक्के रकमेचे अनुदान महापालिकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून जेंडर बजेट अंतर्गत सन २०१८-१९च्या आर्थिक वर्षापासून पात्र महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीकोनातून महिला बचत गट तथा महिलांना सॅनिटरी पॅड, शिवणकाम, घरघंटी व खाद्यपदार्थ आदी प्रकारची यंत्रसामुग्री खरेदी करण्याकरता राज्य शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण धोरणान्वये अनुदान देण्यात येते. त्यामुळे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात पात्र महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोविड प्रादुर्भावामुळे मुंबईतील महिलांची परिस्थिती खालावलेली असल्यामुळे संपूर्ण मुंबईमधून दहा ते पंधरा हजार गरीब व गरजू विधवा महिलांना लघु व्यावसायासाठी शिलाई मशिन, घरघंटी इत्यादी प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून होत आहे, जेणेकरून गरीब व गरजू महिला स्वयंरोजगार करून आपली उपजिवीका पूर्ण करू शकतील.

महिलांचे सक्षमीकरण करताना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी याप्रकारची योजना नियोजन विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून संपूर्ण मुंबईतील २४ विभाग कार्यालयांमधील २२७ प्रभागांमधून महिलांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागवून पात्र महिलांना या यंत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे प्राप्त महिलांचे अर्ज संकलित करून पात्र महिलांची यादी तयार केली जाईल, जर यंत्राच्या तुलनेत पात्र लाभार्थी महिलांची संख्या अधिक असल्यास लॉटरी सोडत काढण्यात येईल आणि उर्वरीत अर्ज बाद करण्यात येतील असे महापालिकेच्या नियोजन विभगाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लेखाविभागा मार्फत लाभार्थ्याला यंत्र सामुग्रीच्या खरेदीच्या प्रत्यक्ष किंमतीच्या ९५ टक्के रक्कम किंवा यंत्रसामुग्रीच्या निश्चित रकमेपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम लाभार्थी महिलेला एक वेळ वापरासाठी स्टेट बँकेच्या प्री-पेड कार्डमध्ये करण्याची कार्यवाही केली जाईल आणि हे कार्ड संबंधित विभागाच्या समाज विकास अधिकारी यांच्याकडे हे सूपूर्त केल्यानंतर ज्या पुरवठादार तथा विक्रेत्या मार्फत हे यंत्र खरेदी करेल त्या विक्रेत्याला लाभार्थी महिलेचे कार्ड स्वाईप केले जाईल, अशाप्रकारची प्रक्रिया राहिल असे या विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महिलांना देण्यात येणारी यंत्रे

  • शिवणयंत्र : ६३५६ (प्रति प्रभाग २८ याप्रमाणे २२७ प्रभागांकरता)
  • घरघंटी : ६३५६ (प्रति प्रभाग २८ याप्रमाणे २२७ प्रभागांकरता)
  • मसाला कांडप यंत्र : १३६२ (प्रति प्रभाग ६ याप्रमाणे २२७ प्रभागांकरता)
  • एकूण मागवण्यात येणारे अर्ज : १४ हजार ७४

कोणत्या महिला ठरू शकता लाभार्थी

विधवा, परित्यक्त्या, ४० वर्षांवरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी (दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रधारक) सर्वसाधारण गरीब व गरजू महिला, कोविड- १९च्या आजाराने ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले अशा गरीब व गरजू महिला

(हेही वाचा – मुंबईतील बालकांना सुदृढ करण्यासाठी महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल; गुरुवारपासून ‘ही’ मोहीम घेतली हाती)

लाभार्थी महिलांसाठी पात्रता

  • मुंबईत १५ वर्षे वास्तव्याचा दाखला
  • वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावी, परंतु ६० वर्षांपेक्षा अधिक नसावी

अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे

  • पिवळ्या तथा केशरी रंगाची शिधापत्रिका
  • आधाड कार्ड
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • प्रतिज्ञापत्र
  • विधवा लाभार्थ्यांच्या बाबतीत पतीचा मृत्यूचा दाखला
  • घटस्फोटाच्या बाबतीतील दाव्याचे कागदपत्र
  • लाभार्थी दारिद्र रेषेखालील असल्यास तसे प्रमाणपत्र
  • गिरणी कामगार असल्यास शिधापत्रिकेवरील गिरणी कामगारचा शिक्का
  • कोविड मृत्यूचा दाखला

लाभार्थीने किती भरायची रक्कम?

  • घरघंटी : एकूण किंमत-२०,०६१ (लाभार्थीने भरावयाची रक्कम : १००२ रुपये)
  • शिवणयंत्र : एकूण किंमत-१२,२२१ (लाभार्थीने भरावयाची रक्कम : ६११ रुपये)
  • मसाला कांडप : एकूण किंमत -३५,५१८ (लाभार्थीने भरावयाची रक्कम : १७७६ रुपये)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.