प्रदेश कॉंग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष बंडाळीच्या वळणावर पोहोचल्यामुळे पक्षातील संभाव्य फुट टाळण्यासाठी हायकमांडकडून थोरात यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मानाचे स्थान देण्यात आले आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून, २६ फेब्रुवारीला या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने शुक्रवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरातांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या नावापुढे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा स्वीकारणार नाही, असेच संकेत हायकमांडने त्यांना देऊ केले आहेत.
प्रदेश कॉंग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनिल केदार, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, खासदार इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे. काँग्रेसचे हे स्टार प्रचारक दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – भाजपमुळे तांबेंचा विजय, आता त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घ्यावा – राधाकृष्ण विखे-पाटील)
Join Our WhatsApp Community