५०० रुपयांसाठी घेतला जीव; दोन भावंडांना अटक

160
मोबाईल फोन रिपेअरिंगचे उर्वरित ५०० रुपयांसाठी तगादा लावणाऱ्या एका तरुणाला दोन भावांनी मिळून मारहाण केली, त्यानंतर त्याची भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री वांद्रे पूर्व येथे घडली. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही भावंडाना अटक केली आहे. नाजिम इफ्तेकार खान (२५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
वांद्रे पूर्व गरीब नगर येथे राहणाऱ्या नाजीम याच्याकडून काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात राहणारा शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा (२१) याने मोबाईल फोन बघण्यासाठी घेतला होता, दरम्यान शादाबच्या हातून मोबाईल खाली पडून तो मोबाईल नादुरुस्त झाला होता. शादाब ने रिपेअरिंग चा खर्च देण्याचे कबूल केले होते. मोबाईल रिपेअरिंगसाठी एक हजार रुपये खर्च झाला परंतु शादाबने केवळ पाचशे रुपये दिले होते, उर्वरित पाचशे रुपये नंतर देतो असे त्याने नाजीमला सांगितले होते. गुरुवारी नाजीमने पाचशे रुपयांसाठी नाजीमने शादाबकडे तगादा लावला होता, आजच उर्वरित रक्कम पाहिजे म्हणून नाजीम हा शादाबच्या पत्नीला बोलून गेल्याचा राग आल्याने गुरुवारी नाजीम आणि शादाबमध्ये भांडण झाले. या भांडणात शादाब आणि भाऊ शानु या दोघांनी नाजीमला मारहाण करून कमरेला असलेल्या चाकूने नाजीमची भोसकून हत्या केली. या घटनेची माहिती मिळतच निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत पाटील पोलीस हवालदार शेख पोलीस नाईक सोनवणे, पोलीस हवालदार पवार पोलीस नाईक वाघमारे व पोलीस शिपाई कोयंडे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत  त्यांना एका तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा नमूद गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला म्हणून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.