जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेले ठाण्यातील पाच माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतील.
माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, सुधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, वनिता घोंगरे यांच्यासह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडित, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत. तसेच याच पट्ट्यातील दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यादेखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राष्ट्रवादीला ठाण्यातील लोकमान्य नगर पट्ट्यात मोठे खिंडार पडणार आहे.
ठाण्यात अशी फुटली राष्ट्रवादी
ठाणे राष्ट्रवादीत यापूर्वी गणेश नाईक, वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड असे तीन गट होते. डावखरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र निरंजन डावखरे आणि गणेश नाईक यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही राष्ट्रवादी ठाण्यात तरली.
सहा महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गटाने ठाण्यातील एकमेव अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या गडाला सुरुंग लावला जात आहे. त्यामुळे एकेक करून राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे गटात दाखल होताना दिसत आहेत.
Join Our WhatsApp Community