सोलापूरात तरसाला काठीने मारले, कायद्यानुसार वाघाएवढेच संरक्षण करण्याची तरतूद; चौकशीची मागणी

171

सोलापूरातील मंगलवेढा तालुक्यातील मरोळ गावाच्या गावकऱ्यांनी तरस या प्राण्याचा पाठलाग करुन त्याला काठीने मारल्याची घटना बुधवारी घडली. तरसाला वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार पहिल्या वर्गवारीत संरक्षण दिले जाते. पूर्ण वाढ न झालेल्या तरसाला गावाबाहेर शोधून त्याचा पाठलाग करुन दोरीने बांधून गावात आणून त्याला काठीने मारले गेले. वाघाएवढेच तरसाचेही संरक्षण करण्याची तरतूद असताना या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

सोलापूरात कर्नाटक नजीकच्या गावाजवळील जंगल भागांत तसेच अक्कलकोट, तुळजापूर, नळदुर्ग भागांत तरस अधूनमधून दिसतात. दोन महिन्यांपूर्वी मरोळी गावाजवळ तरस एका शिक्षकाला दिसला होता. या शिक्षकाने तरसाचा अधिवास गावकुसाबाहेर दिसून येत असल्याने आवश्यक काळजी घेण्याबाबत जनजागृती मोहीम घेतली होती. बुधवारी सकाळी गावातील तरुणांनी पूर्ण वाढ न झालेले तरस दिसल्यानंतर दुचाकीवरुन त्याचा पाठलाग सुरु केला. तरस पळू लागताच त्याला पकडून बांधून गावात आणले. गावकऱ्यांनी त्याला काठीने मारुन नंतर वनकर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले. साडेअकराच्या सुमारास वनाधिका-यांनी तरस गावकऱ्यांकडून घेतला. आणि त्याला बेशुद्धावस्थेतच जंगलात सोडले. दोन तासापर्यंत त्याची हालचाल दिसून येत नसल्याने वनाधिकाऱ्यांनी तातडीने त्याला मंगलवेढा येथे उपचारांसाठी आणले. प्रवासादरम्यानच तरसाने प्राण सोडले.

तरसाला वेळेवर उपचार दिले गेले नाहीत. या घटनेची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना वेळेवर कल्पना दिली गेली का, याबाबत नेमकी कल्पना येत नाही आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा.
भरत छेडा, मानद वन्यजीव रक्षक, सोलापूर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.