आगामी महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उद्धवसेनेकडे ५० जागांचा आग्रह धरला आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे कळते.
( हेही वाचा : सरकारी बाबुंच्या उधळपट्टीला चाप; ‘या’ वस्तूंच्या खरेदीवर घातली बंदी )
उद्धवसेनेने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली असली, तरी अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘वंचित’चा ५० जागांसाठी आग्रह असून, या जागा शिवसेनेच्या कोट्यातून मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
महापालिकेच्या २२७ जागांपैकी १५० जागांवर शिवसेना आपले उमेदवार उतरण्याची शक्यता आहे. उरलेल्या ७७ जागांचे वाटप राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांमध्ये करावे लागणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत तुलनेने कमी आहे. त्यामुळे वंचित अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेकडून निदान ५० जागा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे ‘वंचित’च्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
दबावतंत्राचा अवलंब?
आगामी महापालिका निवडणूक ही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम आहे. या निवडणुकीच्या यशावर शिवसेनेची विधानसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे वंचितच्या मदतीने मुंबईत अधिकाधिक जागा जिंकण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. परिणामी, वंचितला न दुखवता अधिकच्या जागा त्यांना देण्याचा प्रयत्न शिवसेना करेल, असा विश्वास वंचितच्या नेत्यांना आहे. त्यामुळे शिवसेनेवर दबाव तयार करून निदान ५० जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community