इंटरनेट कंपनीकडून आल्याचे सांगून घरात घुसलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेला मारहाण व चाकूने हल्ला करून लूटमार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी परळ येथे घडली. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात चोरी आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांची दाखल घेत नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल )
सूचिता मालवणकर (५९) असे लुटारूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सूचिता पती विजय (६५) यांच्यासोबत परळ येथील सेंट पॉल स्ट्रीट, आराधना इमारतीत पहिल्या मजल्यावर राहतात. सूचिता यांचे पती इंटिरियर डेकोरेशनचे काम करतात. शुक्रवारी सायंकाळी घरातील इंटरनेट बंद झाल्यामुळे पती विजय हे ६ वाजता दादर टीटी येथे मित्राला भेटायला गेले होते. दरम्यान सूचिता या घरात एकट्याच असताना सात वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम घरी आले व ‘जिओ फायबर नेट’ यहा से आये है, असे सांगत त्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सूचिता यांना बोलण्याची संधी न देता त्यांना पकडून तोंडात बोळा कोंबला, व गळ्यातील मंगळसूत्र खेचून कपाटाची चावी मागू लागले, सुचिता त्यांना चावी देत नसल्यामुळे एकाने घरातील किचन मधून चाकू घेऊन दोन ते तीन वेळा छातीत भोसकला चाकू बरगड्यामध्ये अडकून सुचिता या जमिनीवर कोसळल्या आणि लुटारूनी मंगळसूत्रासह पोबारा केला.
काही वेळाने सुचिता यांना शुद्ध येताच त्यांनी बरगडीत अडकलेला चाकू बाहेर काढून पतीला आणि शेजाऱ्यांना फोन केला. पती आणि शेजाऱ्यांनी जखमी सुचिता यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी जखमी महिलेचा जबाब नोंदवून दोन अनोळखी लुटारूंविरोधात चोरी आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लुटारूंचा शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community