मुंबईतील महत्वाच्या व प्रमुख भागांमधील सार्वजनिक भिंतीवर कलात्मक पद्धतीने चित्रे रंगवून सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत किमान १० ते १२ भिंतींची रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्यानुसार दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील कवी केशवसूत उड्डाणपूलावर भिंती चित्रे रेखाटून आसपासचा परिसर सुशोभित केला जात आहे. मात्र, याच चित्र रेखाटलेल्या भिंतीवर उन्हापासून बचाव करण्यासाठी ताडपत्रीचा वापर केला जात असून इतर वेळी भिंतीवर या ताडपत्री लटकवलेल्या ठेवून सुशोभित केलेल्या भिंतींना बकालपणा आणण्याचे काम केले जात आहे.
राजकीय पक्षांकडून बॅनर, होर्डींग लावले जात आहेत
मुंबई महापालिकेच्यावतीने सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून मुंबईतील अनेक विभागांमधील प्रमुख रस्ते आणि पूलांच्या भिंती रंगवल्या जात आहेत. त्याअंतर्गत दादर पश्चिम येथील कवी केशवसूत उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजुच्या भिंती रंगवून त्यावर चित्रे रेखाटली जात आहेत. या भिंतीवर वैभवशाली दादर अशा प्रकारचा संदेश लिहिला आहे. या वैभवशाली दादर चित्रावरच प्लास्टिकच्या पिशव्या लटकताना दिसत आहेत. तर इतर ठिकाणीही उन्हापासून बचाव करण्यासाठी बांधण्यात आलेली प्लास्टिक पिशव्या तिथे गुंडाळून ठेवलेल्या दिसतात. याशिवाय अनेक ठिकाणी रंगवलेल्या भिंतीवर फेरीवाल्यांनी आपल्या पिशव्या लटकलेल्या दिसत आहे. तर सुविधासमोरील पूलाच्या भिंतीवर रंगरंगोटी करून चित्रे काढण्यात आली असली तरी त्यावर विविध राजकीय पक्षांकडून बॅनर, होर्डींग लावले जात आहेत. ज्यामुळे रंगवलेली भिंत आणि त्यावर रेखाटलेली चित्रे तर पूर्णपणे झाकून जात आहेत.
(हेही वाचा पुणे पोट निवडणुकीत बॅनरबाजी; आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा)
सौंदर्यीकरणात बाधा येत आहे
मुंबई महापालिका सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पांतर्गत या भिंती रंगरंगोटीवर कोट्यवधी रुपये खर्च करत असून अनेक ठिकाणी पूलाच्या भिंती रंगवण्यावर लाखो रुपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात चालताना या पूलांच्या भिंतीकडे नागरिकांचे लक्षही जात नाही. मग यावर केलेला खर्चही वाया जात असल्याचे स्पष्ट होत आहे. सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येत असली तरी त्यापूर्वी पूलांच्या रंगरंगोटीची कामे हाती घेण्यात आली होती. केशवसूत उड्डाणपूलाखाली गाळे तोडून मोकळे करण्यात आल्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०२०मध्ये येथील भिंती रंगवून त्यावर चित्रे रंगवण्यात आली होती. परंतु या रंगवलेल्या भिंतीच्या आड फेरीवाल्यांचे व्यवसाय लावले जात असल्याने ही चित्रे झाकली गेली आणि त्यांच्या सौंदर्यीकरणातही बाधा येत आहे.
एका पूलासाठी सरासरी ८० लाखांचा खर्च केला जातोय
केवळ पूलांची रंगरंगोटी नव्हेतर पूलांच्या खालील भागांमधील भिंतीवर चित्रेही रेखाटत त्यांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी शहरातील ३३ पूलांची कामे हाती घेण्यात आली होती, त्यानंतर आता पूर्व उपनगरातील ११ पूलांची सौंदर्यात्मक रंगरंगोटी आणि भिंती चित्रांचे काम हाती घेण्यात आले आहे. या ११ पूलांच्या सौंदर्यात्मक रंगरंगोटीसाठी तब्बल ८.८१ कोटी रुपयांचा खर्च केला जात असून एका पूलासाठी सरासरी ८० लाखांचा खर्च केला जात आहे. शहरातील ३३ विद्यमान पूलांना सौंदर्यात्मक रंगरंगोटी आणि भित्ती चित्रांच्या कामांसाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. शहरातील पूलांच्या रंगरंगोटी व भिंती चित्रांवर सरासरी २० लाख रुपयांचा खर्च केला जात आहे.
Join Our WhatsApp Community