भाजपाने फुंकले निवडणुकांचे रणशिंग; राजकीय प्रस्ताव एकमताने पारित

201
मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या महानगरपालिका, तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रणशिंग फुंकले आहे. शुक्रवार आणि शनिवारी नाशिकमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात राजकीय प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. जनतेला विविध विषयांवर भ्रमित करणारे राजकीय शुक्राचार्य मोठ्या संख्येने भोवती पसरले आहेत,  त्यांच्यापासून जनतेने सावध राहावे, असे आवाहन आज या राजकीय प्रस्तावात करण्यात आले आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय प्रस्ताव मांडला. त्यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रस्तावाला आमदार आशीष शेलार, खा. प्रीतम मुंडे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुमोदन दिले. राजकीय शुक्राचार्यांपासून जनतेला वाचविण्यासाठी कंबर कसून सिद्ध होण्याचा संकल्प या राजकीय प्रस्तावाद्वारे करण्यात आला.
हा प्रस्ताव मांडतांना सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टिका केली. सत्ता गेल्यावर विरोधक प्रत्येक भाषणात फक्त “माझी सत्ता, माझी खुर्ची आणि माझा परिवार” याच्या पलिकडे काही बोलू शकत नाहीत, जनतेचे प्रश्नही मांडत नाहीत; मात्र विविध विषयात जनतेच्या मनात भ्रम निर्माण करत राहतात. गेल्या अडीज वर्षांत मोदी सरकारने जनतेला केलेली मदत आणि राज्यातील जनतेशी द्रोह करून बनविलेल्या विरोधकांच्या सरकारने केलेली अडवणुक यांची तुलना जनता करत आहे. आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपले सरकार आल्यावर शेतकरी, महिला, मागासवर्गीय अशा विविध घटकांना न्याय देत मदत करत आहे.

विरोधकांवर हल्लाबोल

  • एका गावी परवा एक संस्कार वाईन शॉप दिसले त्यात जसा आणि जितका संस्कार आहे, तसा आणि तितकाच राष्ट्रवाद, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, हिंदू धर्म न सोडल्याने ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ठार मारले, त्या औरंगजेबाचा उदो उदो करत छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका असे सांगणारा हाच पक्ष आहे.
  • स्वराज्यशत्रू अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण याच पक्षाने नियमित करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचे सर्व घटक फक्त जनतेत संभ्रम निर्माण करतात, विकासाच्या प्रत्येक प्रक्रियेचा विरोध करतात.
  • केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांचा उल्लेख करून मुनगंटीवार म्हणाले की भारताला विश्वगुरू पदी पुन्हा बघायचे असेल तर “भारत माता की जय” म्हणतानाच केंद्रात मोदींनी आणि राज्यात फडणवीस- शिंदेंनी जी विकासाची कास धरली आहे, त्याला बळ दिले पाहिजे आणि भ्रम निर्माण करणाऱ्या राजकीय शुक्राचार्यांना पराभूत केले पाहिजे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.