फेब्रुवारी महिन्याची सुरुवात तापमानवाढीने झालेली असताना अखेरिस रविवारी मुंबईत किमान तापमान थेट १६.६ अंश सेल्सिअसवर घसरले. फेब्रुवारी महिन्यात २०-२२ किमान तापमान नोंदवले जात असताना सध्या उत्तर दिशेवरुन वाहणा-या थंड वा-यांनी कोकणकिनारपट्टीवर गारेगार थंडीचा अनुभव दिला. गेल्या काही दिवसांपासून उबदार वातावरण अनुभवणा-या मुंबईकरांची रविवारची सकाळ गारेगार वा-यांसह सुरु झाली.
सध्या मुंबईसह कोकणात उत्तरेहून वाहणा-या थंड वा-यांचा प्रभाव आहे. देशात थंडी वाहून आणणा-या पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) या स्थितीमुळे राज्यात थंडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या बहुतांश भागांत फेब्रुवारी महिन्यातील सरासरी किमान तापमानाची नोंद होत आहे. गेल्या चार दिवसांपासून कोकणातील किमान तापमानात घट नोंदवली जात होती. शुक्रवारपासून मुंबईतील किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर खाली घसरले होते. रविवारी किमान तापमानात दोन अंशाने घट होत १६.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंद झाली. सोमवारनंतर किमान तापमान पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पश्चिमी प्रकोप आणि उत्तरेतील थंड वा-यांचा कोकणावरील प्रभाव सोमवारपासून नाहीसा होईल. १५ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान २० तर कमाल ३५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community