शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्येही फूट?

थोरात-पटोले संघर्ष बंडाळीच्या उंबरठ्यावर; सर्वाधिक आमदार थोरात यांच्या बाजूने

158

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निर्माण झालेले राजकीय वादळ अद्यापही शांत झालेले नसताना, आता काँग्रेसमध्येही फुटीचे संकेत मिळत आहेत. मात्र, या फुटीमागे कोणतीही ‘अदृश्य शक्ती’ नसून, पक्षातील अंतर्गत कलह जबाबदार असल्याचे उघडपणे समोर येत आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर बाळासाहेब थोरात महसूलमंत्री बनले; पण त्यावेळी काँग्रेसने त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद काढून नाना पटोले यांना दिले. तेव्हापासून थोरात आणि पटोले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. प्रदेश काँग्रेसच्या बैठकांमध्ये तो अधूनमधून दिसून यायचा. मात्र, सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर हा संघर्ष उघडपणे उफाळून आला आहे. ‘मला पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नाही’, असे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पाठवून थोरात यांनी पटोलेंविरोधात दंड थोपटले आहेत. शिवाय कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देवून दबावतंत्राचाही अवलंब केला आहे. त्यांना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवायचे आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आपली बाजू मांडली आहे.

( हेही वाचा : तुर्कीमध्ये भारतीय व्यावसायिकाचा मृत्यू; टॅटूमुळे पटली ओळख)

काँग्रेसच्या अनेक आमदारांचा बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा आहे. त्यातील काही आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उंबरठ्यावर उभे होते. पण अखेरच्या क्षणी थोरात यांनी त्यांना काँग्रेसमध्ये रोखून धरले. त्याचबरोबर विदर्भातील सुनील केदार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत हे उघडपणे पटोले यांच्या विरोधात आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे आमदारांच्या पाठिंब्याचा विचार केला, तर प्रथमदर्शनी थोरात यांची बाजू वरचढ दिसत आहे. मात्र अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे नेते कोणाबरोबर आहेत, यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.

…तर थोरतांची विकेट जाणार?

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उघडपणे नाना पटोले यांची बाजू घेतली आहे. पटोले हे आम्हा वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन काम करतात, असे प्रशस्तीपत्र त्यांनी दिले आहे. दुसरीकडे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांना थोरात यांची विकेट गेलेली हवी आहे. त्यांना जुने हिशेब चुकते करायचे आहेत. थोरात हे मुळात विलासराव देशमुख यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. २०१९ ला आघाडीची सत्ता आली तेव्हा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि महसूल मंत्रिपद ही दोन्ही पदे त्यांना मिळाली. त्यावेळेस अशोक चव्हाण हे महसूल मंत्रिपदासाठी प्रयत्न करत होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा थोरात यांच्यावर रोष आहे. परिणामी, थोरात यांची विकेट काढण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे कळते.

अशोक चव्हाण इच्छुक

काँग्रेसमधील काही आमदारांमध्ये आधीपासूनच नाराजीचा सूर आहे. आता थोरात यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्यांना बळ मिळाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधील अंतर्गत कलहात प्रभारी एच. के. पाटील यांचीही विकेट जावू शकते. त्यांना प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत कलह रोखता आला नाही. हे पाटील यांचे अपयश आहे, अशी चर्चा आहे. थोरात यांचा राजीनामा मंजूर केला, तर अशोक चव्हाण यांची वर्णी पक्षनेतेपदावर लागू शकते. पटोले यांना बदलले तर ओबीसी किंवा दलित चेहरा प्रदेशाध्यक्ष पदावर आणला जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या गोटातून समोर येत आहे.

हायकमांड कुणाची बाजू घेणार?

कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी तांबे कुटुंबाला पक्षाबाहेर काढून षडयंत्र रचले, असा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला. त्यानंतर थोरात यांनी पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्याशी कोणतीही चर्चा न करता पक्षात परस्पर निर्णय घेतले जात असून पक्षात मला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात माझ्याविरोधात जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. अशा गोष्टीमुळेच मला पटोलेंसोबत काम करणे शक्य नाही, अशी नाराजी व्यक्त करत थोरात यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. दुसरीकडे, सत्यजित तांबेंच्या बंडामागे थोरात हेच आहेत. भाजपशी त्यांनी जवळीक साधली आहे, अशी तक्रार पटोले यांनी केली आहे. त्यामुळे हायकमांड कोणाची बाजू घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.