संशयास्पदरीत्या अपघाती मृत्यू झालेला राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची शासकीय मदत आणि त्यांच्या मुलाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने सामंत यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्रालयातर्फे राज्यभर महामेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. अनेक खासगी कंपन्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविण्यासाठी हे मेळावे घेण्यात येणार असून रत्नागिरीत याचा प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने सामंत रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
पत्रकार शशिकांत वारीसे यांचा संशयास्पदरीत्या अपघाती मृत्यू झाला. राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या मोटारीची जोरदार धडक बसल्याने वारिसे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने विविध पत्रकार संघटना एकवटल्या. वारिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले आंबेरकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी राज्यभर पत्रकारांची निदर्शने झाली. त्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीत आले असताना पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा सामंत यांनी तेथूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर वारिसे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून १० लाख रुपये आणि इतर निधीतून १५ लाख रुपये अशी एकंदर २५ लाखांची मदत करण्याची घोषणा सामंत यांनी केली. वारिसे यांच्या पश्चात आई आणि १९ वर्षांचा मुलगा आहे. त्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याची घोषणाही सामंत यांनी केली.
Join Our WhatsApp Community