आमचे सरकार मुंबई महापालिकेची निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करत आहे, हा आरोप चुकीचा आहे. खरे तर निवडणूक कधीही व्हावी, आम्ही तयार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. टीव्ही ९ वृत्त वाहिनीचा विशेष कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
निवडणुकीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आमच्या हातात काहीच नाही. काही लोक तर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देत आहेत. आधी उच्च न्यायालयाला आदेश देत होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आमचे सरकार ४-५ महिन्यांचे आहे, त्यातच इतके काम केले आहे, त्यामुळे यांना संधी दिली तर काय करू शकतील, हे लोकांना कळून चुकले आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यामुळेच आम्ही सत्तेत येताच मुंबईला खड्ड्यांपासून मुक्ती देण्याचा निर्णय घेतला. आम्ही ही चूक केली का? सत्तेत आल्याबरोबर मुंबईचे काय काय करता येईल, याचा आम्ही आढावा घेतला. आम्ही सत्तेत आलो तेव्हा निवडणुका होत्या का? आम्ही डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा भारत स्वतंत्र, पण मंदिरे पारतंत्र्यात!)
मेरीटवर निर्णय व्हावा
यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले. उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. आम्हाला भीती वगैरे काही नाही. आपले सरकार कायद्याद्वारे स्थापित झाले आहे. या देशाला घटना आहे. नियम आहे. बहुमताला महत्त्व आहे. न्यायालय पुरावे आणि वस्तुस्थिती बघत असते. आम्हाला टेन्शन नाही. मी कधीच न्यायालयाच्या प्रश्नावर उत्तर देत नाही, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community