राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सुनावणी पार पडली. मंगळवारी ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केल्यानंतर बुधवारी शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी, तर राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. यादरम्यान न्यायालयीन वेळ संपल्यामुळे सुनावणी स्थगित करून गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सध्याच्या खंडपीठासमोर राहणार की सात सदस्यांच्या खंडपीठाकडे जाणार? याचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे यांनी जवळपास ३० मिनिटे युक्तिवाद केला. या सुनावणीसाठी ते लंडन येथून ऑनलाईन हजर झाले होते. तसेच ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे हजर होते. आता गुरुवारी पुन्हा शिंदे गटाकडून महेश जेठमलानी, मनिंदर सिंग युक्तिवाद करणार आहेत.
दरम्यान मंगळवारी कपिल सिब्बलांनी केलेला युक्तिवाद बुधवारी हरीश साळवे यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न करत उद्धव ठाकरेंनी गटनेते म्हणून अजय चौधरींच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला. तसेच उद्धव ठाकरेंना ३० जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत होती. वेळ असतानाही उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? महाविकास आघाडीकडे बहुमतासाठी २८८ पैकी १७३ आमदार होते. त्यामुळे केवळ १६ आमदारांमुळे सरकार पडले, असे म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरेंनी परिस्थिती ओळखून बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे बंडखोर १६ आमदारांनी मविआला पाठिंबा दिला असता की नाही, हा मुद्दाच निरर्थक आहे. बंडखोर आमदारांमुळे सरकार पडलेले नाही, असे हरीश साळवे म्हणाले.
Join Our WhatsApp Community