विशेष मुलांचे अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर लवकरच होणार सुरु : अतिरिक्त कामांसाठी दीड कोटींचा खर्च वाढला

179

मुंबई सेंट्रलमधील अ‍ॅलेक्झाड्रा सिनेमासमोरील आशीर्वाद सोसायटी पाच व चार मजली दोन इमारतीच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या असून याठिकाणी विशेष मुलांसाठी अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे सेंटर विकसित करण्यासाठी हाती घेतलेल्या कामांमध्ये तब्बल दीड कोटींनी वाढ झालेली आहे. फेब्रुवारी २०२१ पासून प्रत्यक्षात सुरु झालेल्या या कामांसाठी ७ कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. परंतु आता यामध्ये दीड कोटींची वाढ झाली असून फर्निचर, विद्युत कामांसह इतर कामे वाढल्याने आता याचा एकूण खर्च साडेआठ कोटींवर जावून पोहोचला आहे. त्यामुळे काही महिन्यांमध्येच हे अर्ली इंटरव्हेंशन सेंटर सुरु होणार आहे.

( हेही वाचा : यंदाच्या मोसमी पावसावर ‘एल निनो’चे सावट; वातावरण बदलामुळे धोका वाढणार

मुंबई सेंट्रल येथील बेहराम मार्गावरील अ‍ॅलेक्झांड्रा सिनेमासमोरील आशीर्वाद सोसायटी येथील इमारतींमध्ये विशेष मुलांसाठी अर्ली इंन्टरव्हेंन्शन सेंटर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामामध्ये आशीर्वाद सोसायटीच्या बी विंगमधील तळ अधिक पाच मजले आणि सी विंगमधील तळ अधिक ४ मजल्यांच्या वास्तू महापालिकेच्या ताब्यात आल्या होत्या. त्यानुसार याठिकाणी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर विकसित करण्यासाठी नोव्हेंबर २०२० कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. रिलायबल एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करून या कंत्राट कामाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात या कंपनी दोन्ही वास्तूंमध्ये फेब्रुवारी २०२१मध्ये कामाला सुरुवात केली. त्यानुसार कंत्राटदाराने मूळ सुचवलेले काम पूर्ण केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला असून या कामाच्या व्याप्तीमध्ये वाढ झाल्याने दुसरा ते पाचवा मजला कार्यान्वित करण्यासाठी जी अतिरिक्त कामे आवश्यक आहेत ती त्वरीत करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आली. तर तळ व पहिल्या मजल्यावरील उर्वरीत कामे व अतिरिक्त कामे ही स्वतंत्र निविदा मागवून पूर्ण करण्यात यावी अशाप्रकारचा निर्णय प्रशासनने घेतला. त्यानुसार दुसरा ते पाचवा मजला त्वरीत सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांमध्ये जादा अतिरिक्त कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विद्यमान कंत्राटदाराला ३ महिन्यांचा कालावधी वाढवून दिला असून या अतिरिक्त कामांसाठी १ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या कंपनीला यापूर्वी मंजूर केलेल्या ७ कोटी ०५ लाख रुपयांच्या तुलनेत आता कंत्राट कामांची किंमत ८ कोटी ५२ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.