बंटी आणि बबलीला अटक करण्यासाठी पोलीस बनले वेटर आणि वॉचमन

168

पोलिसांनी वेटर आणि वॉचमनची वेशभूषा करून एका हॉटेलमध्ये दडून बसलेल्या बंटी आणि बबली याच्यावर झडप टाकण्यात आली, या जोडप्याला अटक करून पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई नेहरू नगर पोलिसांच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने घाटकोपरच्या एका हॉटेल आणि लॉजिंग बोर्डिंग या ठिकाणी केली आहे. हे जोडपे पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भाबळ यांनी दिली.

सौरव देवशरण यादव (२४) आणि शाहिनी सौरव यादव (२२) असे अटक करण्यात आलेल्या बंटी आणि बबलीचे नाव आहे. हे दोघे पती-पत्नी असून नवी मुंबईतील सानपाडा येथे राहण्यासाठी आले आहे. चेंबूर शेल कॉलनी येथील श्रावस्ती इमारतीत राहणारे पोलीस कॉन्सटेबल अविनाश विश्राम कांबळे आणि इतर दोन रहिवासी यांचे घरात भरदिवसा घराचे कडीकोयंडे तोडून सुमारे चार लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चन्द्रशेखर भाबळ यांनी गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोउनि सुर्यगंध, गोडबोले यांच्या पथकाला या गुन्हयाची उकल करण्याचे आदेश दिले.

(हेही वाचा Shiv jayanti 2023: योगी सरकारच्या काळात शिवजयंतीच्या यात्रेत पोलिसांचा खोडा)

गुन्हा प्रकटीकरण पथकाने फिर्यादी याच्या इमारतीतील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम घरफोडी करीत असल्याचे फुटेज मध्ये आढळून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा माग काढला असता सदर इसम हा बाहेर आला व त्याने रिक्षा पकडली, त्या रिक्षात बुरखाधारी महिला देखील बसली व ही रिक्षा कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सोडण्यात आली. तेथून या दाम्पत्याने दुसरी रिक्षा पकडून पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपरच्या दिशेने गेले असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाला रिक्षाचा क्रमांक सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळून आल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन त्याच्याकडून भाडे कुठे सोडले याबाबत माहिती विचारली असता त्याने हे भाडे घाटकोपर छेडा नगर येथील एका हॉटेलजवळ सोडल्याची माहिती दिली.

दरम्यान पोलिसांनी छेडा नगर परिसरात हॉटेल शोधून काढले हर्षा लॉजींग व बोर्डिंग या ठिकाणी हे दाम्पत्य थांबले आहे, परंतु ते आता खोलीवर नसून बाहेर गेले असल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापक यांनी दिली. पोलिसांनी बनावट चावीने खोली उघडून हे दाम्पत्य थांबलेले असल्याची खात्री केली, हे दोघे पुन्हा खोलीवर आपले सामान घेण्यासाठी येतील त्या वेळी त्यांना अटक करण्याची योजना पोलिसांनी आखली, मात्र पोलीस वाटू नये म्हणून पोलीस पथकाने हॉटेलच्या वेटरचे तसेच वाचमनचे कपडे घालून या दांपत्यावर पाळत ठेवली. हे दोघे खोलीवर येताच वेटर आणि वाचमनच्या वेशात असलेल्या पोलिसांनी या दोघांवर झडप टाकून त्यांना चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, हे दोघे मंगळवारी सकाळीच हॉटेलची खोली सोडून पश्चिम बंगाल येथे पळून जाणार होते अशी माहिती त्यांनी चौकशीत दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.