अमेरिकेतून वाचविण्यात आले मुंबईतील इंजिनियरचे प्राण

160

मुंबईतील एक तरुण आत्महत्या करण्यासाठी गुगल सर्च इंजिनवर सोपा उपाय शोधत असून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल सेंट्रल ब्युरो (यूएस एनसीबी) या यंत्रणेला समजताच एनसीबी ही यंत्रणा सतर्क झाली आणि या यंत्रणेने इंटरपोल नवी दिल्ली यांना कळवले. मग ही माहिती मुंबई पोलिस यंत्रणेला मिळताच मुंबई पोलिसांनी काही तासांतच या तरुणाचा शोध घेऊन कुर्ला पश्चिम किस्मत नगर येथील एका आय टी कंपनीच्या कार्यालयात येऊन या तरुणाचे समुपदेशन केले. यामुळे त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले.

२५ वर्षांचा हा तरुण जोगेश्वरी येथे राहण्यास आहे. तो कुर्ला पश्चिम लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग किस्मत नगर येथे एका खासगी संस्थेत आय टी इंजिनियर आहे. त्याला स्वतःचे आयुष्य संपवायचे होते, यासाठी तो गुगल सर्च इंजिनवर आत्महत्या करण्यासाठी साधा, सोपा उपाय शोधत होता. गुगल सर्च इंजिनवर आत्महत्या करण्यासाठी मुंबईतून एक व्यक्ती उपाय शोधत असल्याचे यूएस एनसीबी या यंत्रणेला समजताच ही यंत्रणा सतर्क झाली. या यंत्रणेने तात्काळ इंटरपोल नवी दिल्ली येथे संपर्क साधला व माहिती दिली.

इंटरपोल नवी दिल्ली यांच्याकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ५च्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीचा आयपी अॅड्रेस आणि लोकेशन शोधले असता ते लोकेशन एलबीएस रोड, कुर्ला पश्चिम येथे असलेल्या आयटी कंपनीच्या ऑफिसचे असल्याचे आढळून आले. कक्ष ५चे अधिकारी तात्काळ त्या लोकेशनवर पोहचले आणि या आयटी इंजिनियर तरुणाची भेटले. त्यानंतर त्याला समुपदेशन करण्यासाठी कक्ष ५च्या कार्यालयात आणून त्याच्या पालकांना याची सूचना देण्यात आली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले.

(हेही वाचा – कोईम्बटूर स्फोट प्रकरणी एनआयएची तीन राज्यात ६० ठिकाणी छापेमारी)

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, ‘एक वर्षापूर्वी त्याने काही ऑनलाईन कोर्ससाठी २ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर त्याने नवीन मोबाइल घेण्यासाठी त्याच्या एका मित्राकडून ३० हजार रुपये उसने घेतले आणि त्याच्या क्रेडिट कार्डवरून ६५ हजार रुपये खर्च केले होते. कर्ज फेडता न आल्याने तो नैराश्यात गेला आणि त्याने दारुचे सेवनही सुरू केले. यापूर्वी, त्याने दोनदा आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता.’ या तरुणांकडे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन (बीसीए) पदवी आहे आणि तो कुर्ला पश्चिम येथील एका आयटी कंपनीत काम करतो. तो आई-वडील आणि लहान भावासह जोगेश्वरी येथे राहण्यास आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.