गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे बडे नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचं नाव दबक्या आवाजात बोललं जात होतं. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट अशोक चव्हाणांसोबत झाल्याची चर्चा होती. अशातच आता भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना भाजपात येण्याची मोठी ऑफर दिली आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण भाजपात जाणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
प्रसार माध्यमांसोबत बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, ‘जे शपथविधीचं नाट्य झालं त्याबद्दल देवेंद्र फडणवीस जे काही बोलले आहेत, ते वास्तव आहे. काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा फार राहिल्या नाहीत. त्यामुळे अशोक चव्हाणांनी त्यांच्या भूमिकेविषयी पुनर्विचार करण्यास हरकत नाही.’
पुढे विखे-पाटील म्हणाले की, ‘ज्या पक्षात अशोक चव्हाण आहेत, त्या काँग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यतिगत अजिंड्यावर निवडणूक झाली. त्यात पक्षाचा कुठे विचार झाला. पक्षाचा विचार करायला कोणाला वेळ आहे. अशोक चव्हाण सक्षम नेते आहेत, मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. आदरणीय शंकरराव चव्हाणासाहेबांची मोठी परंपरा आहे. विश्वनेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नेतृत्व देशानंच नाही तर जगानं स्वीकारलं, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना काम करायला आवडेल. यामुळे अशोक चव्हाणांनी सुद्धा विचार करायला पाहिजे.’
(हेही वाचा – …तर २०२४ नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल; बच्चू कडूंच मोठं विधान)
Join Our WhatsApp Community