महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी, १६ फेब्रुवारी रोजी राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.
राज्यपालांचे प्रधान सचिव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.
(हेही वाचा ‘आरे’ तील वृक्षतोडीला राज्य सरकारने याचिकाकर्त्यालाच ठरवले जबाबदार)
राज्यपाल बैस यांचे शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.
रमेश बैस यांचा परिचय
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. सन १९८९ साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
Join Our WhatsApp Community