पूर्व उपनगरातील चेंबूर मधील जिजामाता नगर येथे खेळाच्या मैदानासह विविध प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ५ हजार चौरस मीटरच्या भूखंडावरील एकूण ३२ अतिक्रमणे एम पश्चिम विभागाने हटवली. खेळाच्या जागेवरील अतिक्रमणचा विळखा सोडवण्यात आल्याने लवकरच या जागेचा विकास केला जाणार असून ही जागा या विभागातील मुलांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध होईल.
महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभाग अंतर्गत, चेंबूरमध्ये जिजामाता नगर परिसरात सीटीएस क्रमांक २१४अ/१, २१४अ/२, २१४बी, २२० आणि २२२ हे विकास नियोजन आराखडा २०३४ नुसार खेळाच्या मैदानासह विविध उपयोगासाठी आरक्षित आहेत. सुमारे ५ हजार चौरस मीटर क्षेत्राच्या या भूखंडांवर वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमित बांधकामे होती. विकास आराखड्यानुसार आरक्षित कारणासाठी या भूखंडाचा उपयोग करण्याची गरज लक्षात घेता, या भूखंडावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय उप आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनानुसार एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला.
त्यानुसार, १५ फेब्रुवारी २०२३ रोजी एम पश्चिम विभाग कार्यालयाचे १३ अभियंता, वेगवेगळ्या खात्यांचे १७ कर्मचारी, ५२ कामगार तसेच १ पोकलेन, ३ जेसीबी, ३ डंपर, मेसर्स अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कर्मचारी यांनी मिळून या जागेवरील सर्व ३२ अतिक्रमित बांधकामे जमीनदोस्त केली. या कारवाई प्रसंगी आरसीएफ पोलीस ठाण्याने पोलीस बंदोबस्त पुरवला होता.
ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर, एम पश्चिम विभाग कार्यालयाने कार्यकारी अभियंता (पदनिर्देशित अधिकारी) आणि सहायक उद्यान अधीक्षक यांना सदर भूखंड संरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यासाठी कळवले आहे. आरक्षित प्रयोजनांसाठीच ही जागा वापरात येईल, याची महानगरपालिका प्रशासन खातरजमा करेल, अशी माहिती सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community