झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत राहते घर तोडले जाणार असल्यामुळे तीन महिलांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील काळाचौकी येथे गुरुवारी रात्री घडली. तिन्ही महिलांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिन्ही महिलांचा जबाब नोंदवून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद मूळे यांनी दिली.
सुनीता किशोर उघेरजिया (३८), शारदा विनायक उघेरजिया (४९) आणि पुष्पा दिनेश उघेरजिया (४५) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलांची नावे आहेत. या तिघी काळाचौकी येथील जय महाराष्ट्र संघ इमारत क्रमांक ७ आणि ८ येथे राहण्यास आहे. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वर्सन योजना राबविण्यात येत आहे. बांधकाम व्यवसायिक आणि एसआरएकडून स्थानिक लोकांना घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. शुक्रवारी या ठिकाणची घरे जमीनध्वस्त करण्यात येणार होती. घरे खाली करण्यासाठी सुनीता उघेरजीया , शारदा उघेरजीया आणि पुष्पा उघेरजीया यांना देखील नोटीस पाठविण्यात आली होती. या महिलांनी या नोटिसांना विरोध करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती, मात्र त्यांना कुठलीही दाद न दिल्यामुळे गुरुवारी रात्री या तिन्ही महिलांनी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तिन्ही महिलांना तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिन्ही महिलांवर उपचार करण्यात आले असून तिघींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित यंत्रणेने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन तिन्ही महिलांचे जबाब नोंदवून घेण्यात आलेले असून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुळे यांनी दिली. आम्हाला घरे खाली करण्यासाठी बेकायदेशीरित्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे न्याय मागूनही आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही अखेर आत्महत्या करीत आहे असे या महिलांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community