महापालिकेच्या खासगी सुरक्षा रक्षकांना बदलणार

183

एमएमआरडीएकडून प्रकल्पबाधितांसाठी महापालिकेच्या ताब्यात आलेल्या इमारतींसह महापालिका कार्यालये, रुग्णालय आणि प्रसुतीगृहांसाठी खासगी सुरक्षा कंपनीची मदत घेतली जात आहे. मागील २०१५ पासून तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या संस्थांना वारंवार मुदतवाढ देऊन आजपर्यंत त्यांची सेवा घेतली जात आहे. तब्बल दोन हजार खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जात असून यापुढे या संस्थांना मुदतवाढ न देता नव्याने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे लवकर नवीन सुरक्षा संस्थांची नियुक्ती करून सुमारे दोन हजार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराचा मृत्यू)

चेंबूर, मानखुर्द आदी भागांमध्ये एमएमआरडीएने प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या सदनिकांच्या इमारती महापालिकेने सन २०१२मध्ये ताब्यात घेतल्या. परंतु या सदनिकांमध्ये कुठल्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये म्हणून तत्कालिन पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्तांनी एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या सुरक्षा व्यवस्था ही त्याच दर व अटी शर्थीच्या आधारे पुढे कायम ठेवली. त्यानंतर महापालिकेने ०१ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ईगल सिक्युरिटीज या सुरक्षा संस्थेचे नियुक्ती केली. ही मुदत संपुष्टात येण्यापूर्वी नवीन संस्थेच्या नियुक्तीकरता निविदा मागवणे आवश्यक होते. परंतु कोविडची लाट येण्यापूर्वीच प्रथम तीन महिने आणि त्यानंतर एक वर्षांची मुदत या सुरक्षा कंपनीला देण्यात आली. पुढे कोविडच्या नावाखाली ही मुदतवाढ देत आजमितीपर्यंत विनानिविदा या कंपनीला मासिक सव्वा कोटींच्या खर्चाचा भार वाहिला जात आहे.

महापालिकेने या प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये म्हणून या तब्बल ९२५ सुरक्षा अधिकारी व ३० पर्यवेक्षक आदी मनुष्यबळ पुरवण्यासाठी खासगी सुरक्षेसाठी या संस्थेची नियुक्ती केली होती. या सुरक्षा कंपनीला वारंवार तब्बल सात वेळा मुदतवाढ देऊन त्यांना १०४ कोटी रुपये बहाल केले. याशिवाय महापालिका कार्यालये तसेच महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खासगी सुरक्षा कंपनीच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट २०१५ पासून देण्यात आले. यासाठीही सुमारे ११०० खासगी सुरक्षा रक्षकांची सेवाही कंत्राट कालावधीपेक्षा अधिक कालावधीकरता घेतली जात आहे. यासाठीही शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे यासर्व ठिकाणी नवीन संस्थांची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात येत असून दोन हजार खासगी सुरक्षा रक्षक नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.