बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजारी पडलेल्या तीन बिबट्यांच्या बछड्यांचा पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेत उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना अडीच महिन्यांपूर्वीच घडली. मात्र याबाबतीत पुणे वनविभाग तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने कमालीची गुप्तता पाळली. तिन्ही बछड्यांच्या उपचारांसाठी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूर्णवेळ तसेच निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
( हेही वाचा : ठाकरे गटाच्या खासदाराचे शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र; ‘तो’ १४ वा खासदार कोण? )
गेल्या वर्षी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आईपासून दुरावलेले तीन बछडे आणले गेले. कालांतराने तिन्ही बिबट्यांच्या बछड्यांनी चालणे बंद केले. तिघेही बछडे जमिनीवरच लोळून राहायचे. बिबट्यांच्या आजाराचे निदान दोन खासगी पशुवैद्यकीय अधिका-यांनी केले. त्यांच्या शरीरात कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्वाची कमकतरता असल्याचे निदान खासगी पशुवैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या तपासणीत झाल्याने उद्यानातील वन्यप्राण्यांच्या उपचारांच्या तसेच तपासणी पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उद्यानात अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणारे डॉक्टर्स दररोज येत नव्हते. कित्येकदा बरेच दिवस त्यांची उद्यानात गैरहजेरी असायची. उद्यान प्रशासनाने बिबट्यांच्या बछड्यांना उपचारांसाठी अखेरिस त्यांना चेंबूरमधील खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. प्रसारमाध्यमातून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिन्ही बछड्यांना पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेत उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
त्यावेळीच तिघांचीही प्रकृती गंभीर झाली होती. त्यापैकी दोन बछड्यांचा काही दिवसांतच मृत्यू झाला. तिस-या बछड्याच्या प्रकृतीत दोन महिन्यानंतर सुधारणा दिसून येत होती. मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याला आणले गेले नाही. या वादानंतर २२ नोव्हेंबर रोजी उद्यानात पूर्णवेळ आणि निवासी पशुवैद्यकीय अधिका-याची नियुक्ती करण्यात आली. मात्र वाघाटी, गुजरातहून सिंह आणण्यात उद्यान प्रशासन मग्न राहिले. त्यानंतर काही दिवसांनी तिस-या बछड्यााचा पुण्यात रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उद्यानाच्या विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी यांनी संपूर्ण माहिती दिली नाही. पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण तसेच उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनीही प्रतिसाद दिला नाही.