केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर शुक्रवारी निकाला दिला आणि राजकीय वर्तुळातील गणित बदलून गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय आयोगानं दिला. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पण आयोगाच्या या निकालानंतर प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगाने हालाचाली सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. तसंच यासंदर्भात रविवारी, १९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माहितीनुसार अमित शाहांच्या कोल्हापुराच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये आयोगाच्या महत्त्वपूर्ण झालेल्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसंच सरकारकडून यासाठी हालाचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेनशापूर्वीच हा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – ‘या’ मुद्द्यावरून लढा, न्याय मिळेल; प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला)
दरम्यान अमित शाह तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान ते नागपूर, पुणे आणि कोल्हापूर शहरांना भेट देणार आहेत. सध्या ते नागपुरात असून त्यांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुंजींच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर शाह पुण्याला प्रयाण करतील. त्यानंतर रविवारी, १९ फेब्रुवारीला ते कोल्हापूर दौऱ्यावर आहे. कोल्हापूर येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिवाय शाह, पत्नी सोनल शाह यांचं शालेय शिक्षण झालेल्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community