५० लाख रुपयांच्या चोरीच्या मुद्देमालासह नाकाबंदीत ताब्यात घेण्यात आलेल्या २२ वर्षीय सराईत चोराने वरळी पोलिसांच्या कोठडीतून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. हा चोर गुजरात राज्यातील चोर असून त्याला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वरळी पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती पत्रकारांना देण्यात आली होती.
मोहम्मद आफताब कासीम खान उर्फ मोसीन इरफान सय्यद उर्फ शेख (२२) असे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या सराईत चोराचे नाव आहे. मोहम्मद आफताब हा गुजरात राज्यातील रुस्तमवाड, सलबादपुरा सुरत येथे राहणारा आहे. वरळी पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या मोहम्मद आफताब याने सोमवारी पोलीस ठाण्यातील शौचालयाच्या खिडकीतून उडी घेऊन पोबारा केला आहे.
मोहम्मद आफताब याला ९ फेब्रुवारी रोजी रात्री वरळी पोलिसांनी जिजामाता नगर जंक्शन या ठिकाणी नाकाबंदीत संशयित म्हणून ताब्यात घेतले होते, त्याच्याकडे मिळून आलेल्या दुचाकीमध्ये पोलिसांना ५० लाख ३४ हजार रुपयांचे दागिने मिळून आले होते. तसेच तो ज्या दुचाकीवरून आला होता ती दुचाकी देखील चोरीची असल्याचे समोर आले होते. वरळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा ऐवज गुजरात राज्यातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. वरळी पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन मोहम्मद आफताब याच्याविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून गुजरात पोलिसांना याबाबत कळविण्यात आले होते.
(हेही वाचा – पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराचा मृत्यू)
वरळी पोलिसांच्या या कामगिरीनंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना गुन्ह्याची माहितीही देण्यात आली होती. आरोपी पळून गेल्याबाबत पोलिसांकडे माहिती विचारली असता आरोपीवर वरळी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यात त्याला अटक न करता त्याला नोटीस देण्यात आली होती, व त्याचा ताबा घेण्यासाठी गुजरात पोलीस मुंबईत येणार होते. तत्पूर्वी त्याने पोलिसांची नजर चुकवून पळ काढला अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी दिली.
Join Our WhatsApp Community