आत्महत्या करीत असल्याचे ट्विट करणाऱ्या तरुणाचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

175

“मी आत्महत्या करत आहे. त्यापूर्वी मला माझे अवयव दान करायचे आहे. मी लहानपणीच ठरवले होते की, मी मृत्यूपूर्वी माझे शरीर दान करणार असल्याचे,” अशा प्रकारे ट्विटर हँडलवर पोस्ट टाकून आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी नवीन जीवदान दिले आहे. ट्विटरवर आलेल्या पोस्टवरून या तरुणाचा शोध घेऊन या तरुणाचे पोलिसांनी समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

हा तरुण कर्जत येथे राहणारा असून कामाच्या शोधात होता. व्यवसायात सतत होणाऱ्या नुकसानीमुळे हा तरुण कर्जबाजारी झाला होता. वडिलांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढताना त्यांच्या औषध उपचारासाठी डोक्यावर मोठे कर्ज झाले होते. बँकांच्या रिकव्हरी एजंटचे कर्ज फेडण्यासाठी सतत येणारे कॉल त्यातून मिळणाऱ्या धमकीमुळे त्याने स्वतःचे आयुष्य संपवण्याचे ठरवले.

“माझ्या मृत्यूनंतर माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी माझ्या कुटूंबाकडे पैसे नाही, मी जिवंत असताना कुटुंबाला काहीही देऊ शकत नसलो तर मेल्यानंतरही मला त्यांना त्रास देण्याचा अधिकार नाही. मी सध्या खूप रडत आहे कारण मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही, मृत्यूपूर्वी मी माझे अवयव गरजवंताला दान करणार आहे, माझे डीएमएस खुले आहेत, मी आधीच काही डॉक्टरांना टॅग केले आहे. कृपया मला डीएम मध्ये कळवा की, अवयव दान कसे करावे ही प्रक्रिया काय आहे. मला या प्रक्रियेबद्दल आणि सर्व काही माहित नाही. त्यामुळे कृपया मदत करा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. अवयवदान खरोखरच एखाद्याचे जीवन वाचवू शकते.” अशा आशयाची भावनिक पोस्ट इंग्रजीमध्ये लिहून या तरुणाने स्वतःच्या ट्विटर खात्यावरून ट्विट केली होती, त्यात अनेक डॉक्टरांना त्याने टॅग केले होते.

(हेही वाचा – अमेरिकेतून वाचविण्यात आले मुंबईतील इंजिनियरचे प्राण)

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलवर ही पोस्ट येताच मुंबई गुन्हे शाखा आणि सायबर सेल कामाला लागले व तांत्रिक मदतीने या तरुणाचा पत्ता शोधून काढत त्याचा शोध घेतला असता कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. मुंबई पोलिसांनी या तरुणांच्या आई वडिलांना बोलावून या तरुणाला त्यांच्या ताब्यात दिले. तरुण मुलाचा जीव वाचवून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केल्यामुळे आई वडिलांनी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.