महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी काँग्रेस नंबरवन, उद्धव ठाकरे शेवटच्या स्थानावर

160

मागील विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी तत्कालिन उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने महाआघाडी तयार केली. त्यानंतर ठाकरे सरकार कोसळल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महाविकास आघाडी पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु खरी शिवसेना ही ठाकरेंची नसून शिंदे यांची असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीतील महत्वच कमी झाले असून आता या महाविकास आघाडीतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरणार असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शेवटचे स्थान मिळणार आहे.

सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांची तत्कालिन शिवसेना आणि भाजप यांनी युतीत निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपने १६४ जागी उमेदवार उभे केले तर उद्धव ठाकरे यांच्या तत्कालिन शिवसेनेने १२४ जागी उमेदवार उभे केले. या निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. परंतु या निवडणूक निकालानंतर भाजपशी युती तोडून उद्धव ठाकरे यांच्या तत्कालिन शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केले. जुलै २०२२मध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बाजुला होत स्वतंत्र गट तयार करून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची स्थापना केली.

त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली आणि दोन्ही शिवसेनेमधील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षच खरी शिवसेना असून या पक्षालाच धनुष्यबाण चिन्ह देण्यात येत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कोणताही पक्ष नसून त्यांना नव्या पक्षाची घोषणा करावी लागेल.

आजवर ५६ आमदारांच्या बळावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतरही ४० आमदार गेल्यानंतही महाविकास आघाडीतील त्यांच्या पक्षाचे स्थान वरच्या क्रमांकाचे होते. परंतु आता पक्षच राहिला नसल्याने महाविकास आघाडीत ५४ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा ठरणार आहे. तर ४४ आमदार असलेला काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर असेल. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षच नसल्याने महाविकास आघाडीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस जेवढ्या जागा देतील त्यावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – शिवसेना शाखांनाच पोलीस संरक्षण देण्याची आली वेळ!)

विधानसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीत निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसने १४७ तर राष्ट्रवादी काँग्रेसने १२१ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले होते. तर शिवसेनेने भाजप सोबत युतीत १२४ जागा लढवून आपले ५६ आमदार निवडून आणले होते. त्यामुळे विधानसभेत ही महाविकास आघाडी झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जास्त जागा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नवीन पक्षाला केवळ नाममात्र जागा देऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.