मनसेचा मोठा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

158

राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून शिंदे गटात मोठा इन्कमिंग सुरू आहे. असे असताना शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा मोठा निकाल जाहीर केला. तेव्हापासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता मनसेचा एक मोठा नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात मनसेच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पाटील यांच्यासोबत मनसेचे शेकडो कार्यकर्तेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे रायगडमध्ये मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

रायगड जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्यासाठी रुपेश यांनी अनेक कामे केली. पण आता पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुपेश पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

(हेही वाचा – धनुष्यबाण चोरणाऱ्याचे वस्त्रहरण करणार; संजय राऊतांचा इशारा)

दरम्यान यापूर्वीही मनसेतील काही आमदार आणि नगरसेवकांनी पक्षातील गटबाजीमुळे रामराम ठोकला होता. पण आता रुपेश पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेचा पक्षांर्गत वाद चव्हाट्यावर येऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.