मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक विभागाने दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही नवीन पक्ष नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मूळ शिवसेनेत शिंदे यांच्यासोबत जावे लागेल किंवा नवीन पक्षाची निर्मिती करावी लागेल. परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच राहिली नसल्याने त्यांच्या समर्थकांना आता शिवसैनिकही म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे समर्थकांना उद्धव सैनिक किंवा ठाकरे सैनिक म्हणूनच संबोधले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना मनसैनिक म्हणून संबोधले जात आहे. परंतु आता उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षच उरला नसल्याने बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक म्हणून संबोधण्याचा अधिकारही संपुष्टात आला आहे. खरी शिवसेना आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण हे शिंदे यांच्या पक्षाला दिल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिक राहिलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता समर्थक उरले असून त्यांना आपल्या समर्थकांना उद्धव सैनिक किंवा ठाकरे सैनिक असे नाव द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
नियतीनेही उद्धव ठाकरेंना दाखवून दिले
त्यामुळे उद्धव ठाकरे आता नव्याने पक्षाची स्थापना करताना कार्यकर्त्यांची मोट पुन्हा बांधताना कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर फिरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी केली. परंतु पुढे मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या ७ पैकी ६ नगरसेवकांना शिवसेनेने पळवून नेले आणि मनसेचा महापालिकेत केवळ एकच नगरसेवक राहिला होता. परंतु राज्यात ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर तत्कालिन पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही असे सांगत मनसेचे आणि राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. परंतु आता उद्धव ठाकरे यांचा पक्षही संपला असून नियतीनेही उद्धव ठाकरेंना हे दाखवून दिले आहे. त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंची असल्याने त्यांचा व्हीप लागू झाल्यास सर्वांनाच खऱ्या शिवसेनेत राहावे लागेल आणि ज्यांना मान्य नसेल तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्षाची बांधणी केल्यास शिवसैनिक, मनसैनिक नंतर आता उद्धव किंवा ठाकरे सैनिक फिरताना दिसतील.
(हेही वाचा – महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी काँग्रेस नंबरवन, उद्धव ठाकरे शेवटच्या स्थानावर)
Join Our WhatsApp Community