बहुजन वंचित आघाडीची ताकद आता उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी

145

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ४० आमदार आणि १२ खासदार व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत बाजुला झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती केली. ही युती महाविकास आघाडीला मान्य नसून वंचितनेही आपण ही युती उद्धव ठाकरे यांच्या तत्कालिन शिवसेनेशी केली असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबाणाचे चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना नवीन पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे ज्या शिवसेनेच्या राज्यातील पाठबळावर दोन चार आमदार आणि मुंबईत १५ ते २० नगरसेवक निवडून आणण्याची स्वप्ने वंचितने पाहिली होती, ते प्रकाश आंबेडकर हे काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे युती झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा प्रकाश आंबेडकर हे आपण मोठे असल्याचा दावा करत शिवसेना भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युल्याचा वापर करू शकतात, असे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या तत्कालिन शिवसेना पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी असतानाही मित्र पक्षाला विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली. या वंचित आघाडीशी युतीची घोषणा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे दादरमधील आंबेडकर भवनमध्ये पोहोचले. विशेष म्हणजे युतीच्या या घोषणेच्यावेळी पाठिमागे लावलेल्या बॅनरवर वंचित बहुजन आघाडी हे नाव मोठ्या आणि वरच्या बाजुला ठळक अक्षरात होते आणि त्याखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव होते. वंचित आघाडीपेक्षा मोठा पक्ष असतानाही उद्धव ठाकरे यांनी कमी पणा घेत मातोश्रीऐवजी आंबेडकर भवन आणि बॅनरवर शिवसेनेचे नाव वरच्या जागी आणि वंचित आघाडीचे नाव खालील बाजुस अशाप्रकारचा कोणताही हट्ट धरला नाही. मात्र, यावरून उद्धव ठाकरे यांना भविष्यात आपला पक्ष आणि चिन्ह जाणार असून आपल्यापेक्षा वंचित आघाडी हा पक्ष मोठा असल्याची कल्पना असल्यानेच ते या युतीला मान्य झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे या युतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष मोठा असल्याने दोन्ही पक्षांचा दर्जा आता समसमान राहणार आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अस्तित्व संपल्याने प्रकाश आंबेडकर हे आता ही युती कायम ठेवतात की या युतींमध्ये शिवसेना भाजप युती फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेएवढे महत्व प्रकाश आंबेडकर स्वत:कडे घेऊन भाजपचा दर्जा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देत जागा वाटप करून घेत निवडणूक लढवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचा – आता उद्धवकडे शिवसैनिक नाही तर राहणार ठाकरे सैनिक)

विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने २८८ जागांच्या तुलनेत २३६ जागी आपले उमेदवार उभे केले होते. या निवडणूकीत वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. परंतु राज्यभरात २५ लाख २३ हजार ५८३ मते मिळाली होती, जी एकूण मतदानाच्या ४.५८ टक्के एवढी होती. त्यामुळे वंचितने पहिल्याच निवडणुकीत सुमारे साडेचार टक्के मते मिळवली होती. तत्कालिन शिवसेना पक्षाला एकूण ९० लाख ४९ हजार मते मिळाली, जी एकूण मतदानाच्या २० टक्के एवढी होती. ही मते धनुष्यबाणाच्या चिन्हावर मिळाली होती. परंतु आता उद्धव ठाकरे यांच्याकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती मते मिळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.