छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तीमत्व, त्यांचे शौर्य आणि धैर्य यामुळे ते समस्त भारतीयांसाठी आदरणीय ठरतात. मुघल राजवटीच्या अन्यायाविरुद्ध लढणारे आणि लोकांच्या हक्कांचे रक्षण करणारे अशी त्यांची ख्याती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, त्यांचे कर्तृत्व याचा मागोवा घेऊ.
छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शहाजी राजे भोसले यांच्या राजघराण्यात पुण्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातेच्या पोटी झाला. योद्ध्याच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच त्यांना युद्धाचे शिक्षण देण्यात आले, युद्धाचे डावपेच शिकवण्यात आले. लहानपणी, त्यांच्यावर त्यांची आई जिजाबाई यांचा खूप प्रभाव होता, ज्यांनी त्यांच्यात धैर्य, अध्यात्म आणि शौर्य यांचे बीजारोपण केले. त्यांनी शिवरायांना हिंदू महाकाव्यांतील कथांद्वारे प्रेरित केले, त्याची देशभक्ती आणि स्वराज्याप्रती भक्ती आणखी मजबूत केली. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची वर्षे असंख्य आव्हानांनी भरलेली होती. त्यामुळे शिवराय भारतातील सर्वात दिग्गज शासक बनले आणि बलाढ्य मुघल साम्राज्याच्या रस्त्यातील अडथळा बनले. त्यांचे शौर्य, समंजस नेतृत्व यासाठी ते इतिहासात कायम स्मरणात राहिले.
( हेही वाचा: शिवनेरीवरील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे महत्व! )
लाल महालावर कमांडो सर्जिकल स्ट्राइक
औरंगजेबने त्याचा मामा शाईस्तेखान याला दख्खनला पाठवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर लाल महालात हल्ला केला. हा पहिला-वहिला सर्जिकल स्ट्राइक मानला जातो. युद्धात क्वचितच वापरला जाणारा डावपेच आणि तो अत्यंत यशस्वी ठरला. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा प्रतीक होते. त्यामुळे त्यांच्या समकालीन आणि आधुनिक इतिहासकारांकडून त्यांची खूप प्रशंसा झाली.
शिवरायांनी त्यांच्या कल्पक बुद्धीने आणि डावपेचांनी लाल महाल येथे त्याकाळी सर्जिकल स्ट्राइक केला होता. अशा प्रकारे गनिमीकावाने त्यांनी अनेक मोहिमांमध्ये यश मिळवले. छत्रपती शिवाजी यांचे प्रशासकीय कौशल्य देखील उल्लेखनीय होते, कारण मर्यादित संसाधने असूनही त्यांनी कार्यक्षम हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या या स्वराज्यात केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम आणि अठरा पगड जातीचे लोक होते. त्यामुळे त्यांच्यातील धार्मिक सहिष्णुता अधोरेखित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा
जनतेचे रक्षण करणे आणि मराठा साम्राज्याला पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. १६५९ मध्ये मराठा साम्राज्यावर चाल करून आलेला विजापूरचा सुभेदार धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या अफझल खानाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत सावधगिरीने कोथळा बाहेर काढून विजय मिळवळा. तेव्हापासून सुरू झालेल्या त्यांच्या विविध मोहिमांमध्ये त्यांचे धैर्य आणि शौर्य दिसून आले. त्यानंतर मराठा आणि मुघल यांच्यात झालेल्या उंबरखिंडच्या लढाईसारख्या इतर लढाया झाल्या. १६६० मध्ये शाइस्तेखानाच्या विरोधातील लढाई, १६६०-१६६३ मध्ये मुघल सैन्याविरुद्धची लढाई. या मोहिमा शिवरायांनी धोरणात्मकरीत्या आखल्या होत्या, ते केवळ एक योद्धाच नव्हते, तर युद्धनीतीचे सखोल ज्ञान तसेच एक चतुर प्रशासकही होते.
Join Our WhatsApp Community